मुंबईत २४ ला राज्यस्तरीय
बुवाबाजीविरोधी महिला परिषद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि यशवंतराव चव्हाण सेंटर (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. २४) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत राज्यस्तरीय बुवाबाजीविरोधी महिला परिषद होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होईल. ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे अध्यक्षस्थानी असतील. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे ‘बुवाबाजी : बळी स्त्रियांचा, एक मानसशास्त्रीय विश्लेषण’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तिसऱ्या सत्रात ‘जेन-झी टॉक ऑन बुवाबाजी’ या परिसंवादात प्रियांका खेडेकर, हरी आवळे, शीतल वसावे आणि गौरी जाधव हे तरुण कार्यकर्ते सहभागी होतील. ज्येष्ठ साहित्यिका प्रा. नीरजा, अभिनेत्री अनिता दाते आणि ‘अंनिस’चे राज्याध्यक्ष माधव बावगे यांच्या उपस्थितीत समारोप होईल.
गेल्या ३७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या महा. ‘अंनिस’ने जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत एक हजार ५०० हून अधिक गुन्हे दाखल करून भोंदूबाबांचे पितळ उघडे पाडले आहे. या परिषदेसाठी राज्यभरातून ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, नाशिक जिल्ह्यातूनही कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे व प्रधान सचिव नितीन बागूल यांनी सांगितले. ॲड. रंजना गवांदे, गायत्री आडे, विजय परब, आरती नाईक, विष्णू लोणारे आदी कार्यकर्ते यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत.