पान दोन
---------------
13211
वरंवडी : अवैध मद्य विक्री विरोधात आक्रमक होऊन पोत्यात असलेल्या दारूच्या बाटल्या खाली फेकून देताना महिला.
वरंवडीत अवैध मद्यविक्रीविरोधात महिला आक्रमक
विक्रेत्याच्या घरावर मोर्चा; कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १४ : गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री ताबडतोब बंद करावी, या प्रमुख मागणीसाठी वरवंडी (ता. वणी) येथील संतप्त महिलांनी थेट दारूविक्री करणाऱ्याच्या घरावर धडक मोर्चा काढला. अवैध व्यवसाय तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास सर्व महिलांना सोबत घेऊन पोलिस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राघोजी क्रांती सेनेचे संस्थापक सोमनाथ वतार यांनी दिला आहे.
वरवंडी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक व शांततेचे वातावरण पूर्णपणे बिघडत चालले आहे. ग्रामस्थांना आणि विशेषतः महिलांना दररोज नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे महिलांचा संताप अनावर झाला. या पार्श्वभूमीवर महिलांनी एकत्रित येत थेट विक्रेत्याच्या घरावर मोर्चा काढत आक्रमक भूमिका घेतली आणि दारूच्या बाटल्या जप्त करून रस्त्यावर फेकल्या.
दारूविक्री बंद करण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या महिलांवर संबंधित व्यक्तीने अंगावर धावून जाण्याची मग्रुरी दाखवल्याने संतप्त ग्रामस्थांच्या संतापात आणखी भर पडली. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गावात बेकायदा धंदे सुरू असताना त्यावर स्थानिक पातळीवर प्रभावी नियंत्रण का मिळवता येत नाही, असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. तसेच अवैध दारू विक्री बंद करून संबंधितावर कठोर कारवाई न झाल्यास सर्व महिलांना सोबत घेऊन पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमनाथ वतार यांनी दिला आहे.