पान दोन
-----------------
प्रवास सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची अट शिथिल
३१ डिसेंबरपर्यंत कार्ड काढण्याचे आगार प्रमुखांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. ६ : एसटी महामंडळाच्या ''महिला सन्मान योजनेंतर्गत'' प्रवास करणाऱ्या ज्या महिलांकडे अद्याप एनसीएमसी कार्ड उपलब्ध नाही, त्यांनाही ५० टक्के तिकीट सवलतीचा पूर्ववत लाभ घेता येणार आहे. हे कार्ड काढण्यासाठी आता शासनाने ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत दिली असून, बागलाण तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सटाणा आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले होते. मात्र, कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने विशेषतः ग्रामीण भागातील अनेक महिलांपर्यंत अद्याप ही कार्ड्स पोहोचलेली नाहीत. त्यामुळे कोणतीही महिला लाभार्थी सवलतीपासून वंचित राहू नये, यासाठी महामंडळाने कार्डाच्या अनिवार्यतेचा निर्णय तात्पुरता पुढे ढकलला आहे.
---------
७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान सवलत लागू
महामंडळाच्या वाहतूक विभागाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. या सुधारित निर्णयानुसार, ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत एनसीएमसी कार्ड नसतानाही महिलांना ''महिला सन्मान योजने''अंतर्गत ५० टक्के प्रवास सवलत मिळणार आहे. दरम्यान, कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही शिबिरे राबविली जाणार आहेत. ३१ डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांची एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.
कार्ड नसल्यामुळे बागलाण तालुक्यातील महिलांनी एसटी प्रवास टाळू नये. या मुदतवाढीच्या कालावधीत ५० टक्के सवलतीचा पुरेपूर लाभ घ्यावा, तसेच भविष्यातील विनाअडथळा प्रवासासाठी वेळेत आपले एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे.
- हेमंत पगार, आगार व्यवस्थापक, सटाणा