रस्त्यालगतच्या वाईन शॉपविरोधात
महिलांचा सात दिवसांचा अल्टिमेटम
सकाळ वृत्तसेवा
चांदवड, ता. ११ : महात्मा फुले नगर, गणूर रोड परिसरातील रस्त्यालगतच्या वाईन शॉपमुळे महिलांसह नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. दुकान परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याने शिवीगाळ, गोंधळ आणि भांडणांचे प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी प्रभाग सहाच्या नगरसेविका राजश्री प्रजापत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, दुकानाच्या परवानग्यांची तपासणी करून नियमबाह्य बाबी आढळल्यास ते बंद करण्याची मागणी केली आहे.
या परिसरात पिठाची गिरणी, शाळा आणि नागरिकांची वर्दळ असलेली ठिकाणे आहेत. त्यामुळे महिला, विद्यार्थिनी आणि लहान मुलांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मद्यपींच्या वावरामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
परवानग्यांवर प्रश्नचिन्ह
संबंधित वाईन शॉपकडे चांदवड नगरपरिषदेचा व्यापार परवाना आणि ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्याचा दावा प्रजापत यांनी केला आहे. त्यांनी २२ सप्टेंबर आणि ९ ऑक्टोबरला नगरपरिषदेकडे केलेल्या लेखी तक्रारींच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने दुकानचालकाला सात दिवसांची नोटीस बजावली आहे. व्यापार परवाना, एनओसी, बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा, मालकी किंवा भाडेकराराची कागदपत्रे तसेच मद्यविक्रीसाठी आवश्यक वैध परवाने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कागदपत्रे सादर न केल्यास उपलब्ध अभिलेख व परिस्थितीनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे नोटिशीत नमूद आहे.
महिला आणि विद्यार्थिनींना भीतीच्या वातावरणात रस्त्यावरून जावे लागत असेल, तर हा सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न आहे. दुकानाच्या सर्व परवानग्यांची तातडीने तपासणी करून नियमबाह्य बाबी आढळल्यास कठोर कारवाई करावी. सात दिवसांत कारवाई न झाल्यास महिलांसह नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे धरण्यात येईल.
- राजश्री प्रजापत (नगरसेविका)