(दिवाळी अंक लेख)
फोटो : NSK26H32427/ NSK26H32429 (याहा मोगी माता मंदिर व मूर्ती
फोटो : NSK26H32037 भीमसिंग वळवी पासपोर्ट)
--------------------------------
श्रद्धा, परंपरा, सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक
-----------------------------------
आदिवासी कुलदैवत : याहा मोगी देवस्थान
आदिवासी कुलदैवत असलेल्या याहा मोगी मातेचे देवस्थान हे श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेचे जिवंत प्रतीक आहे. पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या धार्मिक परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि आदिवासी जीवनपद्धती यामुळे देवमोगरा हे धार्मिक तसेच सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची आवश्यकता आहे.
- भीमसिंग वळवी
पूर्वी साधी झोपडी आणि नंतर कौलारू घरात असलेले हे मंदिर आता भव्य स्वरूपात उभे आहे. धुळे जिल्ह्याचे तत्कालीन शल्यचिकित्सक स्व.अमृतसिंग वसावे यांच्या पुढाकारातून हे परिवर्तन झाले. दरवर्षी महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीला विशेष यात्रा भरते. आता वर्षभर भाविकांची गर्दी असते. याहा मोगी देवस्थान हे देवमोगरा पर्यटन विकासाचे केंद्रबिंदू ठरू शकते. देवस्थानाशी संबंधित धार्मिक परंपरा, उत्सव, लोकपरंपरा आणि मौखिक इतिहास यांचे दस्तऐवजीकरण करून ते पुढील पिढ्यांसाठी जतन करता येईल.
तत्कालीन खासदार डॉ. हीना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तीन राज्यातील आदिवासींची कुलदेवी याहा मोगी मातेचे देवस्थान असलेल्या ट्रस्ट आणि गुजरात वन विभाग यांच्यातील जागेच्या वादाबाबत चर्चा करून तोडगा काढण्याची विनंती केली होती. तसेच नंदुरबारचे माजीमंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित व गुजरातचे तत्कालीन मंत्री गणपत वसावा यांच्या पुढाकाराने वन विभागाने ट्रस्टला काही हेक्टर जागा दिली. त्यानंतर गुजरात सरकारने ट्रस्टला निधीही उपलब्ध करून दिला. त्यातून व्यापारी गाळे बांधण्यात आले. सुशोभीकरण आणि कॉंक्रिटीकरण झाले. भाविकांसाठी निवारा आणि मूलभूत सुविधा मात्र अद्याप अपुऱ्या आहेत. काही महिन्यांपूर्वी विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भक्त निवासासाठी १० कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याबाबत सांगितले. आमदार आमश्या पाडवी यांच्यासह संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच नंदूरबार जिल्हा बांधकाम विभागाचे इंजि. पालवे, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्यासह गुजरातचे माजी मंत्री गणपत वसावा व काही आमदार यांनी गांधीनगर येथे गुजरातचे मंत्री जयराम गामित व इतर विभागाच्या मंत्र्यांसोबत देवमोगरा देवस्थान विकासाबाबत सकारात्मक चर्चा केली. येणाऱ्या काळात महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांतील लोकप्रतिनिधींनी सामूहिक पुढाकार घेतल्यास भाविकांची गैरसोय दूर होईल. विशेष करून महाराष्ट्रातील सर्वात जास्त भाविक येथे जात असतात.
भाविकांच्या अडचणी
याहा मोगी देवस्थान जंगलात असल्याने हिंस्र प्राणी, सर्प आणि इतर जनावरांचा वावर असतो. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत उपाययोजना वाढविण्याची गरज आहे. पूर्वी मंदिर परिसर सोडून सभोवतालची जमीन गुजरात वन विभागाच्या अधिकारात असल्याने आवश्यक सुविधांच्या बांधकामात अडचणी येत होत्या. याबाबत ट्रस्ट आणि वन विभाग यांच्यात अनेक वर्षे न्यायालयीन लढा सुरू होता. भाविकांसाठी प्रवेशमार्ग, वाहनतळ, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीगृहे, प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक, आरोग्य व सुरक्षा सुविधा यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. उत्सवकाळात गर्दी, वाहतूक, पार्किंग आणि स्वच्छता यांचे व्यवस्थित व्यवस्थापन हवे.
निसर्ग पर्यटन
देवमोगरा परिसरातील निसर्गसंपदा पर्यटनासाठी महत्त्वाची ठरू शकते. निसर्ग भ्रमंती मार्ग, स्थानिक वनस्पतींची माहिती, पर्यावरण शिक्षण केंद्र आणि स्थानिक युवकांना निसर्ग मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देता येईल. पर्यटनामुळे स्थानिक आदिवासी समाजाला रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. युवकांना पर्यटन मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देता येईल. महिला बचतगट व स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला, बांबूच्या वस्तू, स्थानिक कलाकृती यांची विक्री करता येईल. आदिवासी खाद्य केंद्र व हस्तकला विक्री केंद्र सुरू करता येईल. स्थानिक सहभागातून होम स्टे विकसित केल्यास पर्यटकांना आदिवासी जीवनाचा अनुभव मिळेल आणि कुटुंबांना थेट उत्पन्न मिळेल.
विकासाचा आराखडा तयार व्हावा
देवमोरा पर्यटन विकासात शासन, पर्यटन विभाग, आदिवासी विकास विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, देवस्थान व्यवस्थापन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय आवश्यक आहे. ‘स्थानिकांसाठी पर्यटन आणि स्थानिकांच्या सहभागातून पर्यटन’ या तत्त्वावर विकास आराखडा तयार करावा. पर्यटनाचा विकास करताना पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा सुरक्षित राहिला पाहिजे. प्रथम रस्ते, पाणी, स्वच्छता, वीज, वाहनतळ, आरोग्य व सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात. त्यानंतर सांस्कृतिक केंद्र, हस्तकला बाजार, खाद्यकेंद्र, होम स्टे आणि निसर्ग पर्यटन सुविधा विकसित करता येतील. देवमोगरा येथील याहा मोगी देवस्थान केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. धार्मिक श्रद्धा, आदिवासी संस्कृती, निसर्ग, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि हस्तकला यांचा समन्वय साधल्यास देवमोरा एक वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी धार्मिक व सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. यातून स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना उद्योजकीय संधी, कारागिरांना बाजारपेठ आणि ग्रामस्थांना उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात. त्याचबरोबर आदिवासी संस्कृतीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षणही साधता येईल. त्यासाठी ‘देवमोरा सर्वंकष पर्यटन विकास प्रकल्प’ तयार करून शासन, स्थानिक प्रशासन आणि आदिवासी समाजाच्या सहभागातून अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
(लेखक आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे मुख्य संयोजक आहेत.)