वाङ्ममय पुरस्कारार्थ्यांची हेटाळणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yashwantrao chavan maharashtra state literary award nashik

वाङ्ममय पुरस्कारार्थ्यांची हेटाळणी

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळातर्फे स्‍व. यशवंतराव चव्‍हाण राज्‍य वाङ्‌मय पुरस्‍कार २०२०ची नुकतीच घोषणा करण्यात आली. या राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कारांच्‍या यादीतील नाशिकच्‍या साहित्‍यिकांना शनिवारी (ता. १९) विभागातील कर्मचाऱ्यांकडून कुरिअरच्‍या डिलेव्‍हरी बॉयप्रमाणे हे पुरस्कार सूपूर्द केल्‍याने वाङ्‌मय विश्‍वात आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे. पुरस्‍कार प्रदान करण्याची ही पद्धत साहित्‍याप्रति प्रशासकीय उदासिनतेचे दर्शन घडविणारी ठरली आहे. हा पुरस्‍कारार्थींचा सन्‍मान नव्‍हे, तर शासनाकडून झालेली हेटाळणी आहे, अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.

नाशिकमधील ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, डॉ. रमेश वरखेडे, कवी राजू देसले यांच्‍यासह मृदुला बेळे अशा नाशिकमधील चार साहित्‍यिकांना पुरस्‍कार जाहीर झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असताना मर्यादित उपस्‍थितीत का होईना, सार्वजनिक कार्यक्रम पुन्‍हा होऊ लागले आहेत. असे असताना शासनाला वाङ्‌मय पुरस्‍कारांचे वितरण करण्यास वेळ नाही. केवळ सोपस्‍कार पार पाडायचे म्‍हणून हे पुरस्कार कुरिअरने पोहोच केल्‍यासारखे, घरोघरी एका व्‍यक्‍तीच्‍या हस्‍ते पुरस्‍कारांची पोहोच करत शासनाने धन्‍यता मानल्‍याचा असंवेदनशील प्रकार शनिवारी घडला.

यांना झाला पुरस्‍कार ‘पोहोच’ प्रौढ वाङ्‌मय राज्यशास्त्र/समाजशास्त्र प्रकारात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या लोकवाङ्‌मय गृह, मुंबई प्रकाशित ‘अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद’ या पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सूपूर्द केला गेला. यावेळी लता कांबळे, महेंद्र नेटावटे, डॉ. विशाल जाधव, आबासाहेब थोरात, हिरामण नेटावटे, प्रा. अर्जुन पगारे उपस्‍थित होते. बहिणाबाई पुरस्कार कवी राजू देसले यांना कुसुमाग्रज स्‍मारक येथे सूपूर्द केला गेला. प्रौढ वाङ्‌मय पर्यावरण या गटातून डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्‍कार डॉ. मृदुला बेळे यांना कोरोनाच्‍या कृष्ण छायेत या साहित्‍यकृतीसाठी सूपूर्द करण्यात आला.

मंत्री देसाई होते दौऱ्यावर

विशेष म्हणजे, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई एका उद्‌घाटन कार्यक्रमानिमित्त शनिवारी सिन्नर तालुक्‍यात आलेले होते. असे असतानाही त्यांनी राज्यस्‍तरीय पुरस्‍काराच्या वितरणासाठी अवघे काही अंतर पुढे येऊ नये? विभागाचे मंत्री दौऱ्यावर असताना डिलेव्‍हरी बॉयप्रमाणे पुरस्‍कार पोहोच केला जावा. या खेदजनक बाबी असल्‍याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्‍या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील छगन भुजबळ, दादा भुसे असे दोन मंत्री आहेत. महसुली विभाग असल्‍याने नाशिक विभागाचे आयुक्‍त, जिल्‍हाधिकारी, महापालिका आयुक्‍त असे आयएएस दर्जाचे अधिकारीही प्रशासकीय जबाबदारी येथे सांभाळतात. अशात राज्‍य शासनाच्‍याच मानाच्‍या पुरस्‍कारांचे वितरण त्‍यांच्‍या हस्‍ते होऊ शकले नसते का? पुरस्‍कार वितरण प्रक्रियेबाबत हे सर्व घटक अनभिज्ञ होते का? असे प्रश्‍न अनुत्तरीत राहात आहेत.

छायाचित्र टिपण्यासाठी धडपड

पुरस्‍कार सूपूर्द करण्यासाठी आलेल्‍या व्‍यक्‍तीला नाशिक शहराविषयी काहीही माहिती नव्‍हती. अशात पुरस्‍कारार्थींनाच आपल्‍या घरचा पत्ता विशद करावा लागला. इथपर्यंतही ठिक होते. परंतु, पुरस्‍कार सुपूर्द करतांना विभागाला पुरावा सादर करावा म्‍हणून संबंधिताची पुरस्‍कारार्थींसोबत एकल छायाचित्र टिपण्यासाठी केविलवाणी धडपड बघायला मिळाली. अशात शासकीय ओळखपत्र नसताना छायाचित्र घेतल्‍यानंतर वरिष्ठांनी विचारणा नको करायला म्‍हणून संबंधिताने गळ्यात ओळखपत्र अडकवत पुन्‍हा छायाचित्र टिपत परिस्‍थिती सावरली. बॅगमध्ये सन्‍मानचिन्‍ह, प्रमाणपत्र घेत संबंधित व्‍यक्‍ती सकाळपासून पुरस्‍कारार्थींना गाठत होता. राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कारांचे वितरण रिक्षामध्ये फिरत करण्यात आल्‍याने, यामुळेही आश्‍चर्य व्‍यक्‍त होते आहे.

राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या संबंधित पुरस्काराच्या वितरणाबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती नव्हती. याबाबत कोणतीही पूर्वसूचनादेखील मिळाली नव्हती. स्थानिक प्रशासनाला ही बाब माहिती असती, तर किमान मी स्वत: पुरस्कार वितरणासाठी उपस्थित राहू शकलो असतो.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

Web Title: Yashwantrao Chavan Maharashtra State Literary Award Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikaward
go to top