फोटो- 26997
येवला : ऑक्टोबरचा आठवडेबाजार स्थगित करण्याच्या मागणीचे निवेदन उपमुख्य अधिकारी भोये यांना देताना भीमशक्तीचे पदाधिकारी.
मुक्तिभूमी वर्धापनदिनी आठवडेबाजार स्थगितीची मागणी
येवला ः भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे बहिष्कृत वर्गाची परिषद घेऊन धर्मांतराची घोषणा केली. या घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दर वर्षी विविध कार्यक्रम घेतल जातात. यंदा १३ ऑक्टोबरला मंगळवार असल्याने या दिवशी होणारा आठवडेबाजार स्थगित करून तो अन्य दिवशी भरवावा, अशी मागणी भीमशक्तीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केली.
याबाबत नायब तहसीलदार पंकज नेवसे तसेच उपमुख्याधिकारी चंद्रकांत भोये यांना निवेदन देण्यात आले. दर वर्षी मुक्तिभूमी येथे देशभरातून आंबेडकरी अनुयायी दाखल होतात. विविध ठिकाणांहून निघणाऱ्या रॅली आणि मिरवणुकांमुळे प्रमुख रस्त्यांवर गर्दी होते.
या पार्श्वभूमीवर त्याच दिवशी आठवडेबाजार भरल्यास शहरातील वाहतूक, नागरिकांची ये-जा आणि मुक्तिभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांची व्यवस्था यावर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारचा आठवडेबाजार एक दिवसासाठी स्थगित करून तो दुसऱ्या दिवशी भरवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
तसेच येवला-मनमाड महामार्गापासून मुक्तिभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी, मोठ्या संख्येने अनुयायी या मार्गाने मुक्तिभूमीकडे येत असल्याने रस्त्याची दुरुस्ती, वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कार्यक्रमापूर्वी कराव्यात, अशी अपेक्षा निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे, भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव ,तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे, शहर उपाध्यक्ष सुरेश खळे, तालुका उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन, बाळासाहेब सोनवणे, संतोष आहिरे, नीलेश तळेकर, सचिन वाघ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
.......