सेकंड मेन
फोटो- 27007
येवला : विभागीय कुस्ती स्पर्धचे रविवारी उद्घाटन करताना माजी खासदार समीर भुजबळ. शेजारी दत्तू भोकनळ, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी आदी.
कुस्तीची परंपरा जपण्यासाठी आधुनिक सुविधा देणार
समीर भुजबळ ः येवला येथे विभागीय कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ४ : शहराला कुस्तीचा ऐतिहासिक वारसा असून, या परंपरेचे संवर्धन करण्याचे काम लोणारी कुटुंबासह येथील अनेक कुस्तीप्रेमींनी सातत्याने केले आहे. येवल्याची ही कुस्तीची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू असून, परंपरा पुढे नेण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे माजी खासदार समीर भुजबळ यांनी येथे सांगितले.
राज्य क्रीडा व युवकसेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित विभागीय कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते येथील कै. भाऊलाल लोणारी क्रीडासंकुलात रविवारी (ता. ४) झाले, या वेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, माजी सभापती संभाजी पवार, माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, गोरख बलकवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तू भोकनळ आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, की ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि जिद्द मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांना योग्य प्रशिक्षण, आधुनिक साधनसामग्री, दर्जेदार क्रीडा सुविधा आणि स्पर्धेची संधी मिळणे आवश्यक आहे. अशा विभागीय स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळते. खेळाडूंनी उपलब्ध संधींचा पुरेपूर उपयोग करून आपल्या क्रीडा कौशल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कुस्तीपटूंना सरावासह स्पर्धांसाठी अधिक चांगली सुविधा मिळावी यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धांसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक कुस्ती मॅट लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
मुख्याधिकारी तुषार आहेर, पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, मोहन शेलार, राधाकिसन सोनवणे, गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, जावेद लखपती, प्रभाकर झळके, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, अमोल शिंदे, प्रशांत शिंदे, मकरंद सोनवणे, अर्जुन लोणारी, प्रमोद सस्कर, कांतिलाल साळवे, सुभाष पाटोळे, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे आदी उपस्थित होते.