पान चार ॲंकर
------------
27391
येवला : शेतातून बिबट्याला हुसकावताना शेतकरी.
येवल्यात शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
शेवगे परिसरात खळबळ; आरडाओरडा होताच ठोकली धूम
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २ : तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून सोमवारी (ता.२) संध्याकाळी शेवगे परिसरात कांदा चाळीत काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे.
निफाड तालुक्याच्या शिवारालगत सत्यगाव, मुखेड परिसरात आढळणारे बिबटे आता तालुक्याच्या चारही भागात शिरकाव करून दिसू लागल्याने अगोदरच शेतकऱ्यांमध्ये दहशत आहे. यापूर्वी वनविभागाने वेळोवेळी पिंजरे लावून बिबटे पकडले देखील आहे.शेवगे परिसरातील गट नंबर ४१ मध्ये गेल्या दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर सातत्याने सुरू आहे. सोमवारी (ता.२) सायंकाळी पाचला शेतकरी रोहित रतन झांबरे (वय २६) हे आपल्या शेतातील कांदा चाळीत नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घालून हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने रोहित यांनी जोरदार आरडाओरड केली.यावेळी आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावून आल्याने बिबट्याने धूम ठोकली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या दिशेनेही हा बिबट्या धावत सुटला. मात्र प्रसंगावधान राखून शेतकऱ्यांनी जोरदार आरडाओरडा केल्याने बिबट्या झुडपांच्या दिशेने पळून गेला. या हल्ल्यात रोहित यांच्या पायाला व हाताला जखम झाली आहे.
कामात व्यस्त असताना अचानक बिबट्याने हल्ला केला, मात्र वेळीच स्वतःला सावरत मी बाजूला पळत आरडाओरड केल्याने पुढील अनर्थ टळला असे त्यांनी सांगितले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
------
बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
या भागात बिबट्याला पकडण्यासाठी यापूर्वी वनविभागातर्फे पिंजरे लावण्यात आले होते, मात्र अनेकदा बिबट्या या पिंजऱ्यांमध्ये जेरबंद झालेले नाही. परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या जीविताची मोठी हानी टळण्यासाठी वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी,अशी मागणी जोर धरत आहे.