YIN Art Festival : रॅम्‍पवर अदाकारी, फॅशनचा जलवा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Contestants

YIN Art Festival : रॅम्‍पवर अदाकारी, फॅशनचा जलवा!

नाशिक : कुणी जोडी, तर कुणी एकट्याने आपल्‍यातील अदाकारी सादर करत, फॅशनचा जलवा रॅम्‍पवर सादर केला. बॉलिवूडची छाप सोडताना स्‍पर्धकांनी आत्‍मविश्‍वासाने रॅम्‍पवॉक केला. यानंतर प्रश्‍नोत्तराच्‍या फेरीत परीक्षकांच्‍या प्रश्‍नांना चपळतेने उत्तर देताना लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न केला. काहींनी वेस्‍टर्न, तर अनेकांनी पारंपरिक वेशभूषेतून स्‍पर्धक फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. (YIN Art Festival Bollywood impression in fashion show participate with confidence Nashik News)

यिन कला महोत्‍सवांतर्गत फॅशन शोला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरी भागासह ग्रामीण क्षेत्रातील महाविद्यालयांतील स्‍पर्धकांनी सहभाग नोंदविला. फॅशन शोमध्ये प्रारंभी स्‍पर्धकांनी एक-एक करून रॅम्‍पवॉक केला. त्‍यानंतर स्‍वतःचा परिचय करून दिला. यानंतर परीक्षकांनी स्‍पर्धकांची आकलन क्षमता तपासणारे, त्‍यांच्‍या व्यक्तिमत्त्वाची चाचपणी करणारे प्रश्‍न विचारले. त्‍यास तितक्‍याच चालाखीने व चपळतेने उत्तर देताना लक्ष वेधले.

फॅशन शोमध्ये सहभागी स्‍पर्धकांनी इंडो-वेस्‍टर्नपासून पैठणी साडी, पारंपरिक वेशभूषादेखील साकारली होती. या स्‍पर्धेत विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय राहिला. भारतीय संस्‍कृतीचे दर्शन घडविताना, दुसरीकडे पुरुषांच्‍या खांद्याला खांदा लावत कुठल्‍याही क्षेत्रात नावलौकिक मिळवू शकतो, अशी दावेदारी यानिमित्त केली.

हेही वाचा: YIN Art Festival : ‘यिन’ कला महोत्सवाला हर्षोल्हासात सुरवात!

...अन्‌ स्‍पर्धकांचा वाढला आत्‍मविश्‍वास

प्रश्‍नोत्तरांच्‍या सत्रामध्ये परीक्षकांच्‍या प्रश्‍नांनी स्‍पर्धकांची चांगलीच परीक्षा घेतली. यानिमित्त परीक्षकांनी स्‍पर्धकांना त्‍यांच्‍या उज्‍ज्‍वल भवितव्‍यासाठी टिप्सदेखील दिल्‍या. या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी कुठल्‍या गोष्टींचा कटाक्षाने पालन केले पाहिजे, याबद्दलही मार्गदर्शन केले. फॅशन शोसाठी परीक्षक म्‍हणून मॉडेल व अभिनेत्री गायत्री खैरनार आणि मॉडेल व इन्‍फ्‍लूएन्‍सर कीर्ती मोरे यांनी काम पाहिले.

"स्‍पर्धकांमध्ये शहरासह ग्रामीण भागातूनही प्रतिनिधित्व असल्‍याचे समाधान वाटले. सहभागींना त्‍यांच्‍या उज्‍ज्‍वल भविष्यासाठी टिप्‍स दिल्‍या. या व्यासपीठावरून सुरवात केलेल्‍या स्‍पर्धकांनी आणखी मेहनत घेतली, तर त्‍यातील काही स्‍पर्धक नक्‍कीच राष्ट्रीय स्‍तरापर्यंत पोचू शकतील."

- गायत्री खैरनार, परीक्षक

"फॅशन शोमध्ये विद्यार्थिनींचा उत्‍स्‍फूर्त सहभाग वाखाणण्यासारखा होता. स्‍पर्धकांशी संवाद साधताना त्‍यांचे मनोबल वाढविले. आपल्‍यातील कौशल्‍ये विकसित करताना स्‍पर्धक मॉडेलिंग, अभिनय क्षेत्रात उत्‍कृष्ट कामगिरी करू शकतील." - कीर्ती मोरे, परीक्षक

हेही वाचा: YIN Art Festival : ‘Hiphop- Bollywood’चा झटका अन्‌ लावणीचा तडका!