YIN Art Festival : ‘प्रहसना’मधून सामाजिक विषयांची संवेदनशील मांडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Competitors performing a skit at the 'Sakaal Yin' art festival on Friday.

YIN Art Festival : ‘प्रहसना’मधून सामाजिक विषयांची संवेदनशील मांडणी

नाशिक : राजकारण आणि व्यसनमुक्तीसारख्या सर्वसामान्य विषयांपासून तर प्राणी, माणसाच्या काही सवयी आणि मोबाईलसारख्या उपकरणांमुळे प्राणी, पशू-पक्ष्यांना होणाऱ्या त्रासापर्यंत विविध विषयांना प्रहसनाच्या माध्यमातून अत्यंत संवेदनशीलपणे मांडणाऱ्या तरुणाईला मिळालेली दाद अप्रतिम होती. त्यातून मिळणाऱ्या प्रोत्साहनाची शिदोरी या उदयोन्मुख रंगकर्मींना निश्‍चितच बळ देणारी ठरली. (YIN Art Festival sensitive presentation of social issues through Skeet competition Nashik News)

‘सकाळ यिन’ कला महोत्सवात शुक्रवारी स्कीट सादर करताना स्पर्धक.

‘सकाळ यिन’ कला महोत्सवात शुक्रवारी स्कीट सादर करताना स्पर्धक.

‘सकाळ’च्या यिन कला महोत्सवात एकीकडे वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन यांसारख्या पारंपरिक स्पर्धा सुरू असतानाच आयएमआरटी इमारतीतील एका सभागृहात सुरू असलेली प्रहसन (स्कीट) स्पर्धा आणि त्यातील सहभागी स्पर्धकांचा उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

मराठी रंगभूमीवर अजूनही पाहिजे तेवढ्या ताकदीने सादर न होणारा हा प्रकार या स्पर्धेतील उदयोन्मुख कलावंतांनी मात्र आपल्या अभिनयातून जिवंत करून दाखविला. त्यामुळे प्रेक्षक तरुणाईलादेखील उत्स्फूर्त दाद द्यावीच लागली. छोटेखानी कथानकाचे एकत्रित नाट्य रूपांतर आणि त्याचे सादरीकरण करतानाचा कलाकारांमध्येही प्रचंड ऊर्जा आणि उत्साह संचारलेला दिसून येत होता.

हेही वाचा: YIN Art Festival : शिल्पकृती साकारण्यात गुंतले नवकलावंत

त्यात प्रेक्षकांना अन्‌ परीक्षकांनाही खिळवून ठेवण्याची ऊर्मी होती. त्यामुळेच ही स्पर्धा अन्य स्पर्धांपेक्षा वेगळी आणि चित्ताकर्षक ठरली. विविध महाविद्यालयांतील विविध विद्या शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहपूर्वक नोंदविलेला सहभाग भारावून टाकणारा होता. त्याचवेळी वैविध्यपूर्ण सादरीकरणदेखील वाखाणण्याजोगे होते. स्कीट स्पर्धेत सौ. स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌सचे प्रा. प्रवीण जाधव यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले.

"नवचैतन्याची ऊर्जा म्हणजे ‘यिन कला महोत्सव’. या महोत्सवात तरुणाईने अतिशय उदंड प्रतिसाद दिला. आजच्या युवा पिढीत असलेली सामाजिक बांधिलकीची जाण ‘स्कीट’मधील सादरीकरणातून प्रामुख्याने जाणवली. सामाजिक विषय घेऊन स्पर्धकांनी सादर केलेले प्रहसन खरोखरच वाखाणण्याजोगे होते. त्यामुळे ‘सकाळ’च्या यिन कला महोत्सवातून येणाऱ्या काळात मोठे कलाकार घडविण्याचे काम होत असल्याचेही या स्पर्धेतून जाणवले."

-प्रा. प्रवीण जाधव, परीक्षक, सौ. स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स

हेही वाचा: YIN Art Festival : तरुणाईच्या अभिनय क्षमतेचा मूक अभिनय स्पर्धेत कस

टॅग्स :NashikfestivalartSakalYIN