धुळ्यात सहावे योगशिक्षक संमेलन
--
योग फाउंडेशनतर्फे आजपासून महायोगीत्सव २०२६
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः योग फाउंडेशनच्या महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्याचे सहावे योगशिक्षक संमेलन अर्थात महायोगीत्सव २०२६ येथील देवपूरमधील श्री स्वामिनारायण मंदिराच्या प्रांगणात शनिवारपासून (ता. १४) सुरू होत आहे. त्याचा रविवारी (ता. १५) समारोप होईल. याद्वारे राज्यातील योगजगताचा एक कुंभमेळा धुळेनगरीत अनुभवयास मिळणार आहे.
राज्यातील योगाचार्य, योगशिक्षक, योगसाधक आणि योगप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणून योग प्रसाराचा संकल्प सोडणे आणि योगशास्त्राच्या नवनवीन प्रयोगांविषयी मार्गदर्शन मिळवणे या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महायोगीत्सवात विविध विषयांवर योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिके, विशेष योग सत्रे, तसेच राज्य योगसन क्रीडा स्पर्धा होणार आहेत. पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल प्रमुख पाहुणे राहतील. महापौर मायादेवी परदेशी, आमदार अमरिशभाई पटेल, खासदार डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, बीपीएस स्वामिनारायण मंदिराचे संत आनंदजीवन स्वामी, आमदार राम भदाणे उपस्थित राहतील.
दोन दिवसांचे सत्र
महोत्सवाची सुरुवात शनिवारी सकाळी होईल. योगसत्र, सूर्यनमस्कार, ध्यान आणि ध्वजारोहण होईल. सकाळी दहाला उद्घाटन होईल. दुपारच्या सत्रात डॉ. विजयश्रीनाथ कंची, डॉ. रजनी प्रधान, डॉ. राजेश जैन, श्री. कृष्णकुमार शिंदे, सीताराम सोलटकर, प्रा. गोविंद फुक्के मार्गदर्शन करतील. सायंकाळी ‘संगीत रजनी’चा कार्यक्रम होईल. रविवारी पहाटे पाचपासून शंखनाद, ध्यान, प्राणायाम (कुंभक थेरपी) व वॉटर योगचे सत्र होईल. यात डॉ. श्रीकांत वाडिले, डॉ. सुशील महाजन, डॉ. जितेंद्र भामरे मानसोपचार, मणक्याचे विकार आणि योगशास्त्राचा आरोग्यावरील आधार याविषयी मार्गदर्शन करतील. दुपारी राज्य योगसन क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण होईल व दुपारी साडेतीनला महायोगीत्सवाचा समारोप होईल. परजिल्ह्यातून येणाऱ्या योगसाधकांसाठी धुळे रेल्वेस्थानक आणि मध्यवर्ती बस स्थानकापासून स्वामिनारायण मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची सोय केली आहे. योगप्रेमींनी सहभागाचे आवाहन योग फाउंडेशनसह जिल्हा स्वागतोत्सुक समितीने केले आहे.