नोकरी सोडून भाजी विकण्याचं 'या' तरुणांना वेड! आज 500 शेतकरी तरुणांना रोजगार उपलब्ध!

sinner farmers boys.jpg
sinner farmers boys.jpg

नाशिक : शेतकर्‍यांची मुलं शिकतात, शेतीत राम नाही म्हणत नोकरीसाठी पुण्या-मुंबईत जाऊन नोकरी करतात. त्यातलेच काहीजण तर मोठमोठय़ा कंपन्यांत मार्केटिंगचंही काम करतात. पण शेताकडे वळणारे फारच कमी जण असतात. तर काही तरुण शेतकरी विचार करतात की, ते जमू शकतं तर मग आपल्या शेतमालाचं मार्केटिंग आपणच का करू शकत नाही? असा एकप्रश्न मधुकर कांगणे या तरुणाला छळत होता. त्याचं उत्तर शोधायचं असं त्यानं ठरवलं. 

उच्चभ्रू भागात पाणीपुरी विकली जाते, तर मग आपला भाजीपाला का नाही विकला जाणार?
दोडी बुद्रुक (ता. सिन्नर, जि. नाशिक) गावचा हा सुशिक्षित तरुण. अल्पभूधारक असलेल्या आईवडिलांनी सालगडी म्हणून काम करत, मजुरी करून मधुकरला शिकवलं. मधुकरही सुटीच्या दिवशी आईवडिलांना शेतात कामासाठी मदत करून बीएस्सीर्पयत शिकला. पुढे एमबीए केलं. 2000 मध्ये नोकरीसाठी मुंबई गाठली. बँकिंग व फायनान्समध्ये मार्केटिंगचा जॉब मिळाला. नोकरीनिमित्तानं अख्खी मुंबई फिरला. गावी गेला की शेतात काम करणं सुरूच होतं. त्याचवेळी शेतमालाची मुंबईला थेट विक्री करण्याचा भुंगा मधुकरच्या डोक्यात शिरला. त्याला वाटलं दक्षिण मुंबईत मंत्रालय, नरिमन पॉइंट, मलबार हिल या उच्चभ्रू भागात पाणीपुरी विकली जाते, तर मग आपला भाजीपाला का नाही विकला जाणार, या प्रश्नाची तड लावण्याचं त्यानं ठरवलं.

अन् त्याचा अभ्यास सुरु झाला...

मुंबईत भाजीपाला कोठून येतो, तो ग्राहकांर्पयत कसा पोहोचतो याची माहिती घेतली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह परराज्यांतूनही भाजीपाला व फळे वाशी मार्केटमध्ये येतात. त्यानंतर हातगाडीवाले व फेरीवाले हा भाजीपाला मार्केटमधून खरेदी करून त्याची किरकोळ विक्री करतात. शेतकर्‍याने शेतमाल पिकविल्यापासून काढणी, पॅकिंग, वाहतूक, मार्केट, दलाल, हमाल, होलसेल खरेदीदार, किरकोळ विक्रेते ते ग्राहक या सर्व प्रक्रियेचा (साखळीचा) मधुकरने अभ्यास केला. शेतकर्‍यांकडून ज्या कवडीमोल भावाने भाजीपाला खरेदी होतो, तोच शेतमाल पुढे दुप्पट-तिप्पट दराने विकला जातो. मग तो फायदा थेट विक्रीनं शेतकर्‍यालाच का मिळू नये, यासाठी त्यानं अधिक अभ्यास सुरू केला.

ती कल्पना प्रत्यक्षात उतरवणं काही सोपं नव्हतं...

शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाचं पणन विकास महामंडळाचं कार्यालय पुण्यात आहे. तिथं जाऊन त्यानं शेतमाल विक्रीच्या योजनांविषयी माहिती घेतली. नोकरी सांभाळून हा शेतमाल खरेदी-विक्रीच्या उद्योगाची माहिती घेणं सुरू होतं. पणन मंडळाची शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री योजना राबविण्याचं त्यानं ठरवलं. त्यासाठी शेतकरी समूह गटाची आवश्यकता असते. त्यामुळे गावातील समविचारी काही सुशिक्षित मित्रांसमोर त्यानं ही कल्पना मांडली. सर्वाना ही कल्पना आवडली; मात्र ती प्रत्यक्षात उतरवणं काही सोपं नव्हतं. तरीही मधुकर, गणपत केदार व संतोष उगले हे गावातील सुशिक्षित तरुण कामाला लागले. 


पहिलाच प्रयत्न अयशस्वी झाल्यानं सगळेजण जरा नाराज झाले. पण मग...
स्वत:च्या गावाबरोबरच आजूबाजूच्या गावांतही शेतमाल उत्पादक शेतकर्‍यांचा प्रामुख्यानं तरुण शेतकर्‍यांचा समूह गट बनविण्यास त्यांनी सुरुवात केली. २०१३ ला सिन्नर तालुक्यातील शेतकरी गटांची मिळून शेतमाल उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात गडबड पहिला प्रयोग कांदा विक्रीचा करू असं ठरलं. सर्व गटांनी कांद्याची योग्य पद्धतीने निवड, प्रतवारी व पॅकिंग करून विक्रीसाठी थेट मुंबईत आणला; परंतु थेट विक्रीची गाडी मुंबईबाहेर नाक्यावरच अडवण्यात आली. यावेळी राज्य शासनाच्या मॉडेल अ‍ॅक्टची (नवीन पणन विक्री कायदा) माहिती देऊन शेतकरी कोठेही शेतमाल विकू शकतो, असं या समूह गटाने सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी हा नियम मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्याचं त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांना शेवटी सर्व कांदा वाशीच्या मार्केटमध्ये नेऊन विकावा लागला. या तरुणांच्या कंपनीच्या पहिलाच प्रयत्न अयशस्वी झाल्यानं सगळेजण जरा नाराज झाले.

शेतकर्‍यांना थेट विक्रीसाठी खुली करण्यासाठी पाठपुरावा

पण मग त्यांनी ठरवलं, अजून प्रयत्न करू. केवळ मुंबईवर अवलंबून न राहता, बंगलोर, दिल्ली, कलकत्ता अशा देशभरातील मोठय़ा मार्केटचा अभ्यास दौरा सुरू केला. या परराज्यांतील बाजारपेठेत शेतमाल खरेदी-विक्रीच्या पद्धतीची माहिती घेतली. त्यानंतर पणन महामंडळाकडे मुंबई शहरातील बाजारपेठ शेतकर्‍यांना थेट विक्रीसाठी खुली करण्यासाठी पाठपुरावा केला. यावेळी पणन विभागाचे तत्कालीन अपर सचिव सुनील पोरवाल, उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील, सुभाष घुले या अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केलं. जुलै २०१६ ला पणन मंडळाने एक क्रांतिकारक निर्णय घेऊन मुंबईसाठी फळे व भाजीपाला बाजारपेठेच्या कायद्यातून मुक्त केला. अन शेतकर्‍यांसाठी पर्याय म्हणून "संतशिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजार योजना" सुरू केली. 

शेतकर्‍यांची पोरं ग्राहकांच्या मागणीनुसार घेताएत मार्केटचा कल...
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात पहिला आठवडा बाजार भरवण्याचा निर्णय झाला. अन् पहिला बाजार आयोजित करण्याची संधी नाशिकच्या या शेतमाल उत्पादक कंपनीला मिळाली. त्यांनी संधीचं सोनं करायचं ठरवलं. थेट शेतमाल विक्रीचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईचा रस्ता मोकळा झाला. मधुकरला मुंबईची माहिती होतीच. त्यांनी शहरातील प्रमुख सोसायटय़ांची माहिती घेण्यास सुरुवात केली. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी अशा विविध भाषांमध्ये थेट शेतमाल विक्रीची माहिती देणारी पत्रकं तयार करून उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये वाटण्यात आली. सोशल मीडियाचाही उपयोग केला. नागरिक व ग्राहकांकडून फोनवर चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु नरिमन पॉइंट, मलबार हिल या ठिकाणी कोणीही आठवडा बाजारासाठी जागा देण्यास तयार होईना. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेऊन अनेकांशी संपर्क साधला. अखेर मलबार हिल येथील आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मकता दर्शविली. ब्रीच कँडी येथील अमरसन गार्डनला जाणार्‍या रस्त्याच्या बाजूची जागा आठवडा बाजारासाठी देण्याची तयारी दाखविली. महापालिका व वाहतूक पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलं. त्यानंतर 30 सप्टेंबर 2017 ला प्रत्येक आठवडय़ाच्या शनिवारी मलबार हिल व रविवारी मंत्रालयाचे पार्किग या ठिकाणी दुपारी 4 ते रात्री 8 यावेळेत आठवडा बाजार सुरू झाला. आता ग्राहकांना दज्रेदार व किफायतशीर भावात नियमित भाजीपाला व फळभाज्या पुरविण्याची जबाबदारी आली.

एक दिवशी साधारण 70 ते 80 क्विंटल शेतमालाची विक्री

पणन मंडळाच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील चार, पुण्याचे चार व सातार्‍याचे दोन अशा दहा शेतकरी समूह गटांनी आठवडा बाजारात भाग घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या जिल्ह्यातील प्रमुख भाजीपाला, फळे व फळभाज्या आणण्याचं नियोजन झालं. आता शेतकर्‍यांची पोरं ग्राहकांच्या मागणीनुसार मार्केटचा कल घेऊ लागली. पिकवला शेतमाल विकण्याचा हट्ट सोडून आता बाजारपेठेत "विकते ते पिकवण्याचा" नवा धडा तरुण शेतकर्‍यांना मिळाला. हंगामानुसार भाजीपाला व फळांचे उत्पादन घेऊन पुरवठा सुरू झाला. पहिल्या महिन्यातच ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करण्याचा अंदाज आला. एक दिवशी साधारण 70 ते 80 क्विंटल शेतमालाची विक्री सुरू झाली. प्रत्येक शेतकरी उत्पादक व विक्री गटाने उत्पादन, पॅकिंग, वाहतूक व मार्केटिंगची जबाबदारी वाटून घेतली. शेतमाल विक्रीची दलालांची साखळी तुटल्याने शेतकरी व ग्राहक दोघांनाही त्याचा फायदा होऊ लागला. प्रत्येक गटातील किमान 10 या प्रमाणे 10 गटांतील 100 तरुणांना नवीन रोजगार निर्माण झाला. केवळ दज्रेदार उत्पादन करून उपयोग नाही, तर योग्य मार्केटिंग केलं तर शेतकर्‍याला निश्चित फायदा होतो, असा आत्मविश्वास तरुणांना मिळाला. त्यामुळे पदवीधारक व उच्च पदवीधर, तसेच इंजिनिअरिंग केलेले अनेक सुशिक्षित तरुण या गटांच्या माध्यमातून नोकरीपेक्षा अधिक पैसा मिळवत आहेत. 

शेतकर्‍यांच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नवीन संधी
आठवडय़ातील दोन दिवस मुंबई मार्केट अन पाच दिवस शेती करण्यात ही तरुण मंडळी व्यस्त असतात. मुंबईतील ग्राहकांच्या मागणीनुसार लवकरच सेंद्रिय भाजीपाल्याचं उत्पादन व विक्री सुरू करणार असल्याचं सिन्नर येथील शिवांजली शेतकरी गटाचे प्रकाश ठोक आत्मविश्वासानं सांगतात. आपण जे पिकवलं ते थेट विकण्याचे नव्या मार्केटिंगचे धडे आता हे तरुण शिकत आहेत. नोकरी सोडून शेतीचं मार्केटिंग शेतकरी समूह गटांना आठवडा बाजार सुरू करण्याची संधी देण्याचा शासनाचा निर्णय क्रांतिकारक आहे. त्यामुळे माझ्यासारखी शेतकर्‍यांची अनेक सुशिक्षित मुलं नोकरी सोडून थेट शेतमाल विक्रीमध्ये येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरातील मुंबईतील आठवडा बाजाराचा शेतकरी तरुणांना होणारा फायदा चांगला आहे. आमच्या सिन्नरमधील एका शेतमाल उत्पादक कंपनीची उलाढाल 50 लाख आहे, तर गेल्या वर्षभरातील सर्व 10 गटांची आठवडा बाजारांची शेतमाल विक्रीची उलाढाल अंदाजे 10 कोटींची आहे. शिवाय या थेट शेतमाल विक्रीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे 500 शेतकरी तरुणांना रोजगार निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com