तरुण विजेच्या धक्क्याने ४० टक्के भाजला
चिंचोलीजवळील घटना; खांबावर चढल्याने जोरदार धक्का
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : कामाच्या शोधात असताना विजेच्या खांबावर चढलेल्या तरुणाला विजेचा जोरदार धक्का बसून तो ४० टक्के भाजल्याची घटना मंगळवारी (ता. १७) सकाळी चिंचोली गावाजवळ घडली. भाईदास कर्तार राठोड (वय ३५, रा. धानवड तांडा, ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाईदास राठोड हे मजुरीचे काम करतात. कामानिमित्त ते चिंचोली परिसरात गेले होते. मंगळवारी सकाळी ते अचानक एका विजेच्या खांबावर चढले. तेथे त्यांनी वीजतारांना हात लावताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्यांचा उजवा हात, छाती, पोट आणि पाठ भाजली गेली. विजेचा धक्का बसल्यानंतर काही वेळाने ते खांबावरून खाली कोसळले. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी भाईदास यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ते सुमारे ४० टक्के भाजल्याचे समोर आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
चौकट
‘व्हायरल’ छायाचित्रामुळे पटली ओळख
दरम्यान, जखमी तरुणाचे छायाचित्र नागरिकांनी सोशल मीडियावर प्रसारित केले. हे छायाचित्र धानवड तांडा येथील रहिवाशांच्या पाहण्यात आल्यानंतर त्यांनी भाईदास यांना ओळखले. त्यानंतर गावातील नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.