दुचाकीच्या धडकेत
तरुणाचा मृत्यू; दोघे जखमी
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १७ : वणी ते नांदुरी रोडवर श्रीहरी टाइल्स दुकानाजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तुषार शांताराम महाले (वय २५, रा. मार्कंड पिंप्री, ता. कळवण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्कंड पिंप्री येथील रहिवासी तुषार महाले हा शेतीचे बी-बियाणे आणि औषधे घेण्यासाठी आपल्या युनिकॉर्न मोटारसायकलने (एमएच ४१ बीडब्ल्यू ३२९६) वणी येथे आला होता. काम आटोपून रात्री साडेआठच्या सुमारास तो वणीहून नांदुरीच्या दिशेने जात असताना, नांदुरी बाजूकडून भरधाव आणि चुकीच्या दिशेने (राँग साइड) येणाऱ्या स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १५ एपी ६८२५)स्वाराने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तुषारच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि तोंडाला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून तुषारला मृत घोषित केले; तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक स्वरूपाराम तारूराम (रा. कृष्णनगर, ता. फलोदी, जि. जोधपूर, राजस्थान) आणि सहप्रवासी सवाईराम राजुराम (रा. बापूनगर, जि. जोधपूर, राजस्थान) या दोन किरकोळ जखमींवर उपचार केले. या घटनेप्रकरणी मृत तरुणाचे वडील शांताराम महाले (वय ४८) यांनी वणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मोटारसायकलस्वार स्वरूपाराम तारूराम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.