NSK26H34360
नंदुरबार : ‘माय भारत’तर्फे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. संतोष महाजन, डॉ. ओम सुगंधी, डॉ. अधिकार बोरसे, यशवंत हिरे, पवन नाईक, भूषण पाटील आदी.
---
युवकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय व्हावे
एमकेडी कॉलेजमध्ये ‘विकसित भारत युवा संवाद’; मतदानाच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ९ : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत केंद्रातर्फे एम. के. डी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे ‘विकसित भारत युवा संवाद- आपले मत जाणून घ्या’ कार्यक्रम झाला.
युवकांमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे आणि लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘माय भारत’ केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी प्रास्ताविकातून माय भारतच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. या वेळी डॉ. संतोष महाजन, डॉ. ओम सुगंधी, डॉ. अधिकार बोरसे, यशवंत हिरे आणि पवन नाईक उपस्थित होते. कार्यक्रमात लोकशाही शपथ घेण्यात आली. युवा आयकॉन कमलेश सोनवणे यांनी मतदानाचे महत्त्व, मतदारांचे अधिकार व कर्तव्ये, तसेच लोकशाही प्रक्रियेतील युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. युवा संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विचार मांडले. या वेळी युवकांना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून सूचना व अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
‘आपले मत हाच आपला आवाज आहे आणि जागरूकतेने दिलेले मत देशाच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवू शकते’, असे माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी सांगितले.