NSK26H34165
जळगाव : युवारंग-२०२६ महोत्सवातील सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाऱ्या मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संघाला पारितोषिक देताना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व हेमंत पाटील.
---
युवारंगात मूळजी जेठा महाविद्यालयाची बाजी
---
सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले; चोपड्याचे महाविद्यालय उपविजेते
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन ‘युवारंग २०२६’ युवक महोत्सवात खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळविले. सिनेकलावंत व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले.
कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. संगीत आणि नृत्य या कला प्रकारांत मूळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. रंगमंचीय कला प्रकारात विद्यापीठ प्रशाळेने, तर ललित कलांमध्ये चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाने बाजी मारली. महोत्सवात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये रमण्याऐवजी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले. सातत्य, शिस्त, वेळेचे महत्त्व, परिश्रम आणि चिकाटी ही पंचसूत्री विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असा सल्ला कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी दिला. दिव्यांग कला महोत्सवातील विजेत्यांचाही गौरव करण्यात आला. ‘युवास्पार्क’ स्पर्धेत कृषी, हेल्थटेक, डीप टेक आणि ओपन इनोव्हेशन क्षेत्रांतील ५३ नावीन्यपूर्ण कल्पना व प्रकल्प सादर झाले. सर्वोत्तम १५ स्पर्धकांना ‘केसीआयआयएल’तर्फे वर्षभर मोफत सहाय्य दिले जाणार आहे.