
मालेगावी गोल्डन नगरात तरुणाचा खून; दोघा संशयितांना अटक
मालेगाव : शहरातील गोल्डननगर भागात मध्यरात्री सलमान अहमद सलीम (वय २८, रा. जलकुंभाजवळ, बागे मेहमुद) या तरुणाचा मागील भांडणाच्या वादातून दोघा संशयितांनी कोयत्याने डोक्यावर, चेहऱ्यावर व बरगडीवर जबर वार करुन त्याचा खून केला.
दोघा संशयितांच्या हल्ल्यात सलमान जागीच ठार झाला. हल्ल्यानंतर दुचाकीवर फरार झालेल्या दोघा संशयितांना पवारवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासात मनमाड बसस्थानकावरुन ताब्यात घेतले. (Youth killed in Malegavi Golden Nagar Both suspects arrested nashik crime news)
सलमान अहमद हा चोऱ्या-घरफोड्यांमधील संशयित आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात पाच ते सात गुन्हे दाखल होते. सलमानचे किरकोळ कारणावरुन तौसिफ अहमद रफीक अहमद उर्फ राजू व अकील अहमद मोहम्मद सुब्राती उर्फ पापा (दोघे रा. गोल्डननगर) यांच्याशी वाद होते. दोघा संशयितांनी सलमानला काल रात्री फोन करुन गोल्डननगर भागात बोलाविले.
यानंतर दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्यावर धारदार कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यात तो जागीच ठार झाल. खुनाची घटना समजताच अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. जे. बडगुजर, उपनिरीक्षक नाजीम शेख आदी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी परिस्थितीची पहाणी करुन शहरात नाकाबंदी केली. संशयितांचे मोबाईल लोकेशन काढून त्यांच्या शोधासाठी मनमाड येथे एक पथक तातडीने रवाना केले. श्री. बडगुजर, श्री. शेख, उपनिरीक्षक विनोद परदेशी, पवन सुकनार, पोलिस नाईक भरत गांगुर्डे, संतोष सांगळे, उमेश खैरनार, नवनाथ शेलार, राकेश जाधव आदींच्या पथकाने मनमाड येथे सापळा रचून बसस्थानकावर बस मधून उतरत असतानाच दोघा संशयितांना ताब्यात घेतले. दोघे मनमाड रेल्वेस्थानकावरुन उत्तर प्रदेशात पलायन करण्याच्या तयारीत होते.
मयत सलमानचे वडील सलीम अहमद जब्बार (वय ४८, रा. बागे मेहमूद) यांच्या तक्रारीवरुन पवारवाडी पोलिस ठाण्यात तौसिफ अहमद व अकिल अहमद सुब्राती विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी दोघा संशयितांना अटक करण्यात आली. पवारवाडी पोलिसांनी आज दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.