NSK26H33799, NSK26H33800, NSK26H33801, NSK26H33802
जळगाव : पाश्चिमात्य समूहगान करताना विद्यार्थी कलावंत. दुसऱ्या छायाचित्रात भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीतात बासरी वादन करताना विद्यार्थी. तिसऱ्या छायाचित्रात स्थळचित्र रेखाटताना विद्यार्थिनी. शेवटच्या छायाचित्रात मूकनाट्य सादरीकरण करताना विद्यार्थी कलावंत.
---
शास्त्रीय नृत्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन
(उपशीर्षक)
पहिल्याच दिवशी महोत्सवात भरला रंग; स्थळचित्रातून उमटला विद्यापीठाचा परिसर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू झालेल्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ‘युवारंग २०२६’ आणि दिव्यांग कला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उत्कृष्ट सादरीकरण झाले. प्रामुख्याने पाश्चिमात्य समूहगान, भारतीय शास्त्रीय नृत्य व शास्त्रीय संगीत स्पर्धेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. मूकनाट्य, वक्तृत्व, स्थळचित्रे आणि व्यंगचित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलात्मकतेचे आणि सर्जनशीलतचे दर्शन घडविले.
युवारंग २०२६च्या उद्घाटनानंतर विविध सांस्कृतिक स्पर्धांना सुरुवात झाली. (कै.) वाय. एस. महाजन मुलींची वक्तृत्व स्पर्धा, (कै.) ग. वी. अभ्यंकर मराठी नाट्यगीत व (कै.) शांताबाई अभ्यंकर मराठी भावगीत गायन स्पर्धा व कबचौ उमवि बहिणाबाई करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकी स्पर्धा झाल्या.
उत्कृष्ट सादरीकरण
युवारंग महोत्सवात रंगमंच क्रमांक १ महात्मा फुले सभागृहात पाश्चिमात्य समूहगान आणि भारतीय शास्त्रीय नृत्यात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. यात १४ संघ सहभागी होते. रंगमंच २ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भारतीय शास्त्रीय संगीतात स्वरवाद्य आणि तालवाद्यात विद्यार्थ्यांनी सुरेल स्वरातून आपली प्रतिभा सादर केली. रंगमंच ३ शाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या मूकनाट्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हावभाव, देहबोली आणि चेहऱ्यावरील भाव यांच्या माध्यमातून महिला अत्याचार, मानसिक ताण-तणाव, ड्रंक ॲन्ड ड्रायव्ह आदी सामाजिक विषयांची प्रभावीपणे मांडणी करत उपस्थितांची दाद मिळवली.
कुंचल्यातून साकारली दृश्य
रंगमंच ४ संत रविदास सभागृहात वक्तृत्व स्पर्धेत महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे ओघवत्या शैलीतून मांडणी केली. यात ६२ विद्यार्थी सहभागी झाले होते. रंगमंच ५ संत गाडगेबाबा सभागृहात स्थळचित्र स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कुंचल्यातून दृश्य साकारली, तर व्यंगचित्रे स्पर्धेत विविध सामाजिक विषयांवर कल्पकतेतून सर्जनशीलता व्यक्त केली. या स्पर्धेत ४९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
इन्फो
युवारंगमधील आजचे सादरीकरण
भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, भारतीय समूहगान, भारतीय शास्त्रीय गायन, पाश्चिमात्य वाद्यसंगीत, पाश्चिमात्य गायन (सर्व एकल), प्रहसन, मिमिक्री, वादविवाद स्पर्धा, चिकट कला, माती कला, स्थळ छायाचित्र.