esakal | निलेश लंकेंच्या घरी पोहचले शरद पवार, प्लास्टिक खुर्चीवर बसून कुटुंबाची विचारपूस
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार निलेश लंकेंच्या घरी पोहचले शरद पवार

आमदार निलेश लंकेंच्या घरी पोहचले शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर तालु्क्यातील राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) आपल्या कामाच्या पद्धतीमुळे अल्पावधीतच महाराष्ट्रासह पक्षश्रेष्ठींचेही लाडके झाले. शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार स्वत: आमदार निलेश लंके यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले होते. अहमदनगर येथील आपला नियोजित कार्यक्रम आटोपून पुण्याला जात असताना शरद पवार यांनी सुपा येथे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट दिली. छोट्याशा खोलीत राहणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या घरी शरद पवारांनी एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून आमदार लंके यांच्या आई-वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली.

आमदार निलेश लंके यांनी पवार यांच्या भेटीची माहिती सोशल मीडियातून दिली. निलेश लंके यांनी शरद पवार यांनी घरी भेट दिल्याचे काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये निलेश लंके म्हणतात की, "आदरणीय शरद पवार साहेब यांनी आज माझ्या घरी सदिच्छा भेट दिली हे मी माझं भाग्य समजतो! माझ्या सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी आमदार करून समाजसेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचा सदैव ऋणी राहील! या सदिच्छा भेटी वेळी उपस्थित अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ साहेब,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब,आमदार रोहित पवार,मा.आमदार दादाभाऊ कळमकर,जिल्हा अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके व उपस्थित सहकारी व समस्त ग्रामस्थ हंगा पंचक्रोशी!''

सरपंचापासून नगरसेवक आणि आमदाराची घरे आलिशान असतात. मात्र आमदार निलेश लंके यांचं राहणीमान अत्यंत साधे आहे. त्याप्रमाणेच त्यांचेही घर अतिशह साधे आहे. एका छोट्या खोलीत ते राहतात. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमधून लंके यांचा साधेपणा दिसून येतो. आमदार निलेश लंके यांच्याघरात छोटं किचन, बाथरूम, एक खोली असं सर्वसामान्य माणसासारखं साधं घर आहे. या घरात निलेश लंके आपल्या कुटुंबासोबत राहतात. शरद पवार घरी येताच त्यांची काहीशी धावपळ उडाली. यावेळी आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी परिसरातील लोकांनी एकच गर्दी केली होती.

साधी राहणी, चोवीस तास लोकांसाठी

लंके यांनी दहावीनंतर आयटीआय केले. त्यानंतर ते एका कंपनीत नोकरीला लागले. मात्र, त्या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे त्यांनी चहाची टपरी टाकली. परंतु ती कार्यकर्ते आणि मित्रांना चहा पाजता पाजता पुरती डुबून गेली. सुरूवातीपासून त्यांना गरिबीचे चटके बसले. त्यामुळे त्यांनी बडेजाव केला नाही. आताही ते साध्या घरात राहतात.

loading image
go to top