अधिकारी माणसातील अशीही माणूसकी..!   

एल. बी. चौधरी
Friday, 5 February 2021

आमचे रडकुंडीला आलेले चेहरे पाहून ते आमच्याजवळ आले. आमची व्यथा आम्ही त्यांना सांगितली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता आम्हाला कारमध्ये जागा दिली.

सोनगीर : कोरोनाने जवळच्या नातेवाईकांनाही दूर ठेवण्यास भाग पाडले. आज कोरोना कमी झाला असला तरी अजूनही एक माणूस दुसर्‍या माणसाला शिडी चढतांना हात द्यायला घाबरतोय. अशा परिस्थितीत एक अनोळखी व्यक्ती आमच्यासाठी देवदूतासारखी मदतीस धावून आली. खरेच त्यांनी मदत केली नसती तर आमचे किती हाल झाले असते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून धुळ्याचे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ आहेत. विजय श्रीराम सैंदाणकर सांगत होते.

आवश्य वाचा- अन् ‘तिला’ मिळाले जगण्याचे बळ ! 
 

विजय सैंदाणकर हे मुळ सोनगीरचे रहिवासी असून सध्या अंबरनाथ येथे वास्तव्यास आहेत. ते बुधवारी (ता. 3) पत्नी प्रभा, मुलगी श्रद्धासह गंभीर आजारी असलेले वडील श्रीराम आनंदा सैंदाणकर यांना भेटण्यासाठी अंबरनाथहून धुळ्याला बसने निघाले. बस चांदवडच्या अलिकडे नास्ता व चहासाठी थांबली. तेव्हा उतरले. मुलगी काहीशी गतिमंद असल्याने तिच्या खाण्यापिण्यात अतिरिक्त वेळ गेला आणि बस निघून गेली. बराच वेळ झाला तरी दुसरी बस किंवा एखादे वाहन मिळेत नव्हते. आधीच लाॅकडाऊनमुळे खाजगी कंपनीतील नोकरी गेलेली. नुकतीच दुसरी नोकरी कशीतरी पण कमी पगारावर मिळाली. त्यामुळे सध्या प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करीत असताना, जेमतेम धुळ्याच्या तिकिटाएवढे पैसे जमा करून अंबरनाथहून निघालो होतो. अंबरनाथहून नाशिक व नाशिकहून बायपास बसने धुळ्याला जातांना ही घटना घडली.

आणि देवमाणूस भेटला..

आता धुळ्याला जायचा पून्हा खर्च करायचा कसा? पैसे नव्हतेच. तिकडे अत्यवस्थ वडीलांच्या तब्येतीची काळजी वाढत होती. मी पोहचण्यास अगोदर काही झाले तर? मी बायकोजवळ पैश्याची विचारणा केली तर तिच्याजवळ जेमतेम पन्नास रुपये होते. एवढ्या पैश्यात धुळ्याला पोहोचणे एकालाही शक्य नव्हते. आम्ही तिथेच हाँटेलमध्ये बसून होतो. मात्र आमचे नशीब आम्हाला देवमाणूस भेटले. आमचे रडकुंडीला आलेले चेहरे पाहून ते आमच्याजवळ आले. आमची व्यथा आम्ही त्यांना सांगितली. त्यांनी क्षणाचा विलंब न करता आम्हाला कारमध्ये जागा दिली. पुढे रस्त्यातच माझ्या गतिमंद मुलीने त्यांच्या गाडीत उलटी केली. पण त्यांनी पाण्याची बाटलीने आणून घाण साफ केली.

आवर्जून वाचा- नवापूरने 'बर्ड फ्लू'चा घेतला धसका; प्रशासन ‘हाय अलर्ट’वर 

अन् देवमाणूस उपजिल्हाधिकारी निघाले

आम्हाला फारच अवघडल्यासारखे झाले. मात्र ते म्हणाले काही संकोच करू नका. उलट मला गरजवंताची सेवा करण्याची संधी मिळाली. असे समजा. त्यांना त्यांचा परिचय विचारल्यावर आम्ही अवाकच झालो. ते आपल्या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी रमेश मिसाळ आहेत. हे जाणून एका अधिकारीतील माणूसकीचा वेगळा अनुभव आला. वाटले प्रत्येक जण असा देवमाणूस राहिला तर आपला देश जगाचा मार्गदर्शक होईल.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: need help marathi news songire dhule deputy collectors help needy