ऑनलाइन पेमेंट करताय...सायबर गुन्हेगारांची फसवणुकीची 'ही' आहे नवी शक्कल

नरेश हळणोर : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

रोखीच्या व्यवहारापेक्षा सुरक्षितता म्हणून ऑनलाइन व्यवहाराकडे पाहत असताना, सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे. त्यामुळे अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. याबाबत जनजागृती करूनही फसवणूक होतच असल्याने अदृश्‍य स्वरूपातील सायबर गुन्हेगारांपुढे सायबर पोलिसही हतबल झाले आहेत. सायबर गुन्हेगारीत ओटीपी घेऊन फसवणूक करणे, एटीएम कार्ड क्‍लोनिंग करून गंडा घालण्याचे प्रमाण असले, तरी त्याहीपलीकडे सायबर गुन्हेगार पोचलेले आहेत. 

नाशिक : डिजिटायझेशनच्या आजच्या जमान्यात आर्थिक व्यवहाराची गतीही ऑनलाइनमुळे वाढली आहे. मात्र, ऑनलाइन पेमेंट करतानाचा व्यवहार डोळसपणे हाताळता न आल्यास तुमच्या बॅंकेच्या खात्यात एक रुपयाही राहणार नाही, हे नक्की! सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाइन आर्थिक गंडा घालण्यासाठी नवनवीन क्‍लृप्त्या वापरल्या जात आहेत. त्यातच अलीकडे क्‍यूआर कोडने पेमेंट करण्याचा फंडा वापरून गंडा घालण्याचा नवी क्‍लृप्ती (ट्रीट) सायबर गुन्हेगारांकडून वापरली जात आहे. आतापर्यंत अनेकांची लाखोंची फसवणूक केल्याचे प्रकार घडले आहेत. 

सावधान! अदृश्‍य गुन्हेगार शोधत आहेत..
खरेदी-विक्रीची अनेक ऑनलाइन संकेतस्थळे आहेत. हीच संकेतस्थळे सायबर गुन्हेगारांसाठीचे सावज हेरण्याचे ठिकाण असते. ओएलएक्‍स यासारख्या संकेतस्थळावर एखाद्या वस्तूच्या विक्रीची जाहिरात पाहून, अदृश्‍य असलेल्या सायबर गुन्हेगाराने ती वस्तू विकत घेण्यासाठी त्या व्यक्तीला फोन करतो. त्या वेळी तो त्या वस्तूची रक्कम "फोन पे' वा "गुगल पे' यांसारख्या ऑनलाइन ट्रॅन्झक्‍शन ऍपवरून वस्तू मालकाच्या फोनवर पाठविल्याचे सांगतो. वस्तू मालकाच्या फोन पेवर सायबर गुन्हेगाराने पाठविलेली रक्कम न आल्याचे सांगितल्यावर संशयित सायबर गुन्हेगार त्यास ऍपच्या नोटिफिकेशनमध्ये पेंडिंग असल्याचे सांगतो. याच ठिकाणी जर जागरूकता नसेल तर फसवणूक होत असल्याचे लक्षात येते. कारण संशयित सायबर गुन्हेगाराने नोटिफिकेशनमध्ये एक क्‍यूआर कोड सेंड केलेला असतो. अजाणतेपणे जर तो क्‍यूआर कोड स्कॅन केला तर तुमच्या बॅंक खात्यातून सारे पैसे संशयित एका क्षणात वळती करून घेऊ शकतो. त्यामुळे संशयिताने पाठविलेला क्‍यूआर कोड हा पैसे येण्यासाठी नसून पैसे घेण्याचा असतो. त्या क्‍यूआर कोडच्या खाली बारीक अक्षरात "प्लीज पे टू' असे म्हटलेले असते. अशा वेळी संशयिताला क्‍यूआर कोड स्कॅनिंग न करता थेट बॅंकेचा खाते क्रमांक देत त्यात पैसे पाठविण्यास सांगितले तर संशयिताच्या लक्षात येते, की सावज फसणारे नाही. त्यामुळे आपली फसगत आपण अशारीतीने टाळू शकतो. 

ओटीपी, एटीएम क्‍लोनिंगच्या पुढचे पाऊल 
ऑनलाइन लॉटरी, लाखो डॉलर्सचे बक्षीस लागणे यांसारखे ई-मेल वा मोबाईलवर एसएमएस येतात. त्यावर एक लिंक असते. त्यावर क्‍लिक करण्याची सूचना दिली जाते. त्यावर क्‍लिक केल्यास काही क्षणात ई-मेल वा मोबाईल हॅक होऊन त्यातील गोपनीय माहिती अदृश्‍य असलेल्या सायबर गुन्हेगारांपर्यंत पोचते. त्यातील माहितीच्या आधारे संशयित तुमच्या बॅंक खात्याशी संबंधित माहिती मिळवितो आणि काही मिनिटांत बॅंक खात्यातील रकमेवर ऑनलाइन डल्ला मारला जातो. 

ऑनलाइन व्यवहार करतानाची दक्षता 
आपला यूपीआय पिन कोणालाही देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत यूपीआय मेसेज कोणत्याही क्रमांकावर पाठवू नये  पैसे पाठवा, वस्तू पाठवतो असे सांगणाऱ्यावर विश्‍वास ठेवू नका."गुगल'वरून कस्टमर केअर क्रमांक सर्च करून त्यावर संपर्क साधताना सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहार मात्र टाळा प्रत्यक्ष वा सुरक्षित आर्थिक व्यवहारावर भर द्यावा. आर्थिक व्यवहाराबाबत शंका असल्यास संबंधित बॅंकेशी संपर्क साधावा 

प्रतिक्रिया
अनोळखी व्यक्तीशी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना, क्‍यूआर कोडवरून व्यवहार करणे टाळले पाहिजे. उच्चशिक्षित व्यक्तीही असे व्यवहार करून स्वत:ची फसवणूक करून घेतात. सावधगिरी बाळगल्यास ऑनलाइन व्यवहार सुरक्षित आहेत. - देवराज बोरसे, पोलिस निरीक्षक, नाशिक सायबर पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New method of fraud for cyber criminals Nashik Crime News