झाडांना पाणी घालण्यासाठी लढविली अनोखी शक्कल! (व्हिडिओ)

New Technology for Irrigation
New Technology for Irrigation

दाभाडी : ढवळेश्‍वर (ता. मालेगाव) येथील प्रफुल्ल निकम या शिक्षकाने झाडांना पाणी घालण्यासाठी एक अनोखी शक्कल लढविली आहे. टाकाऊ पाईपचा उपयोग करून तयार केलेले हे उपकरण वृक्ष संवर्धनासाठी, फळबागा जगविण्यासाठी तसेच दुष्काळी भागासाठी 'स्वस्तात मस्त' उपाय ठरू शकतो.

हे उपकरण करण्याच्या कल्पनेने त्यांच्या मनात अपघातानेच जन्म घेतला. त्यांच्या शेतात जमिनीत खोलवर गाडलेल्या पाईपलानईला तडे गेले. त्यामुले त्यातून पाणीगळती होऊ लागली. मात्र, गळती झालेल्या भागातील एकमेव झाड त्यांना हिरवेगार दिसले. त्याचवेळी आसपासची अन्य झाडे सुकलेली होती.

मालेगाव कॅम्प येथील केबीएच विद्यालयाचे जीवशास्त्राचे शिक्षक प्रफुल्ल निकम यांनी त्यांचे मोठे बंधू नंदकुमार निकम यांच्या मदतीने यातूनच नवी सिंचनपद्धती शोधली. त्यात दोन इंची जुना पाइप तीन फूट बाय पाच फूट इंग्रजी अक्षर 'एल' आकाराचा तयार केला. चार फुटांचा खड्डा खोदून त्यात एक फूट मुरूम आणि खताचा थर दिला. पाइपचे जमिनीतले तोंड बंद करून पाईपच्या पृष्ठभागावर सिंचनासाठी चार छिद्रे घेऊन ही बाजू खड्ड्यात ठेवली. वरून पुन्हा माती टाकून त्यावर नवीन रोप लावले. पाईपच्या उभ्या बाजूमधून औषधे आणि पाणी टाकता येते.

या पद्धतीमुळे झाडाच्या थेट मुळांना सिंचन होते. पाण्याची बचत, विद्राव्य खतांचा पुरवठा, गांडूळनिर्मितीला चालना, गवत आणि बाष्पीभवनाला आळा, असे बहुउद्देशीय काम यामुळे होईल. दुष्काळी भागात फळबागशेती आणि वृक्षसंगोपनासाठी हा प्रयोग बहुआयामी ठरणार असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले. ओलिताखाली क्षेत्रवाढीसह डोंगरवाटांवर रोपे जगविणे, पाईपलाइन शक्‍य नसलेल्या भागासाठी ही पद्धत वरदान ठरू शकते.

बहुपयोगी उपकरण
पिकाचा वापसा उत्पादकाला आवाक्‍यात आणता येईल. बुरशीजन्य आजारांवरील फवारणीचा आणि गवत निंदणीचा खर्च कमी होईल. विद्राव्य खते थेट झाडाच्या मुळांपर्यंत पोचतील. गवत नसल्याने तृणभक्षी प्राण्यांपासून झाडाचे संवर्धन होईल.
- प्रफुल्ल निकम, शिक्षक, केबीएच विद्यालय, मालेगाव

टाकाऊपासून टिकाऊ
शेतात विविध आकाराचे पाईपचे भरपूर तुकडे पडून असतात. या प्रयोगासाठी पाईपच्या आकाराचे बंधन न पाळता सोयीनुसार वापर करावा. ज्या भागात पाईपलाइन खोदणे शक्‍य आहे, त्या भागात कमी पाण्यावर झाडांना सहज जगविता येईल, असे अनेक फायदे यातून मिळतात. 
- नंदकुमार निकम, शेतकरी, ढवळेश्‍वर (ता. मालेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com