Vidhan Sabha 2019 : उत्तर महाराष्ट्रातून ४२ हून अधिक जागा जिंकू - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

उत्तर महाराष्ट्रातून ४२ हून अधिक जागांवर विजय संपादन करू तसेच राज्यात २४० हून अधिक जागांवर विजय मिळवू, असा विश्‍वास जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

नाशिक - उत्तर महाराष्ट्रातून ४२ हून अधिक जागांवर विजय संपादन करू तसेच राज्यात २४० हून अधिक जागांवर विजय मिळवू, असा विश्‍वास जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघ बूथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अशोका रोड येथील बगई बॅंक्वेट येथे हा मेळावा झाला. प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, आमदार देवयानी फरांदे, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, भाजप ज्येष्ठ नेते विजय साने, सतीश कुलकर्णी, मध्य-पश्‍चिम मंडळ अध्यक्ष देवदत्त जोशी, द्वारका मंडल अध्यक्ष सुरेश मानकर, उपमहापौर प्रथमेश गिते, सुनील देसाई, सुजाता करजगीकर, भारती बागूल आदी उपस्थित होते.

भाजप हा कार्यकर्त्यांची अथक मेहनत व परिश्रमातून उभा राहिलेला पक्ष आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी निःस्वार्थपणे काम करत असून, त्याचेच फलित २०१४ व २०१९ च्या लोकसभेत घवघवीत यश व २०१४ चे राज्यातील घवघवीत यश आहे. येत्या काळात कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेऊन येत्या विधानसभेत ‘न भूतो न भविष्यति’ अशा प्रचंड यशाने मुख्यमंत्री फडणवीस प्रचंड मतांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा विश्‍वास पालकमंत्र्यांनी  व्यक्त केला. 

प्रदेश पदाधिकारी लक्ष्मण सावजी यांनी जे मतदार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी संपर्क हवाच. परंतु जे आपल्या बरोबर नाहीत, त्यांच्याशी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदार हा भाजपशी जोडला पाहिजे, अशी प्रमुख भूमिका पदाधिकाऱ्यांची असल्याचे सांगितले. आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील आपल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. देवदत्त जोशी यांनी प्रास्ताविक केले. सुरेश मानकर यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Maharashtra to win more than 42 seats says Girish Mahajan