नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक घोडचूक- मुणगेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नाशिक - पंतप्रधानांनी कुठल्याही पूर्वतयारीशिवाय घेतलेला एवढा मोठा निर्णय हा दैनंदिन जीवन उद्‌ध्वस्त करणारा आहे, तसेच अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट आणणारा व ती ठप्प करणारा आहे. निर्णय घेताना अंमलबजावणीची उपाययोजना नव्हती. त्यामुळे ही ऐतिहासिक घोडचूक आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.

नाशिकमध्ये समता अभियानाच्या विभागीय अधिवेशनाला आलेल्या डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची चिरफाड केली. डॉ. मुणगेकर म्हणाले, की गेल्या 60 ते 70 वर्षांत जगभरात काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटा रद्द करून त्यापेक्षा अधिक किमतीच्या नोटा छापल्या; पंरतु कोठेही हा निर्णय यशस्वी झालेला नाही. त्यामुळे हजार व पाचशेच्या नोटा रद्द करून दोन हजाराची नोट चलनात आणणे, ही बौद्धिक दिवाळखोरी असल्याचाही आरोप त्यांनी केला. हे सरकार शंभर व पन्नासच्या पुरेशा नोटा छापू शकत नसल्यामुळे त्यांनी दोन हजाराची नोट बाजारात आणल्याचा आरोप केला. देशातील एकूण चलनातील सुमारे 15 लाख कोटी रुपयांच्या चलनापैकी 12 लाख कोटी रुपये बॅंकांत जमा झाले. यातील काळा पैसा कोणता व पांढरा कोणता, याची वर्गवारी सरकार करू शकेल काय, असा प्रश्‍न विचारतानाच एवढ्या मोठ्या संख्येने प्राप्तिकर विवरणांची तपासणी करणारी यंत्रणाही सरकारकडे नसल्याने ही केवळ धूळफेक असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रांगेत उभे राहणे हे देशभक्ती असल्याचे म्हटले होते, याचा समाचार घेताना डॉ. मुणगेकर म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनीही रोज दोन तास रांगेत उभे राहून देशभक्ती करण्यास हरकत नाही.

गव्हर्नर पटेल यांनी राजीनामा द्यावा
नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात संपूर्ण अपयश आल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी डॉ. मुणगेकर यांनी केली.

Web Title: Notabandica decisions historical blunder