आता लग्नाची बोलणी निवडणुकीनंतरच ... 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीसाठी (ता.२१) ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. त्यामुळे या तारखेला कौटुंबीक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम न घेता दुसऱ्या तारखा काढत नियोजनात बदल केला जात आहे. सध्या लगीनघाई सुरू नसली, तरी लग्नांची पूर्वतयारी म्हणून बोलणी, पसंती, पाहण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.

देवळा : विधानसभा निवडणुकीसाठी (ता.२१) ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. त्यामुळे या तारखेला कौटुंबीक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम न घेता दुसऱ्या तारखा काढत नियोजनात बदल केला जात आहे. सध्या लगीनघाई सुरू नसली, तरी लग्नांची पूर्वतयारी म्हणून बोलणी, पसंती, पाहण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. नारळ, साखरपुडा, उदघाटने, मेळावे व काही कार्यक्रम दिवाळीदरम्यान होतात. काही सामाजिक संस्था सामाजिक- सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. दिवाळी सुटीत बाहेरगावी जाण्याचे प्लॅन केले जात असले, तरी २१ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे.

बहुतेक वधू-वरांचे नातेवाईक निवडणुकीत व्यस्त

कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली आहे. बहुतेक वधू-वरांचे नातेवाईक, संयोजक, सभासद शासकीय सेवेत असल्याने त्यांची अनुपस्थिती या कार्यक्रमांना जाणवल्याशिवाय राहणार नाही, म्हणून या कार्यक्रमांसाठी इतर तारखा धरण्याचा आग्रह धरला जात आहे. प्रत्येक गावातील नेते-कार्यकर्ते निवडणुकीत सक्रिय असून, त्यांची गैरहजेरी असण्याची शक्‍यता जास्त आहे. निवडणुकीसाठी मंगल कार्यालये, केटरर्स, आचारी, वाहने आदींची आधीच बुकिंग झाली आहे. मतदान जागृती लक्षात घेता मतदानासाठी प्रत्येक मतदार आग्रही आहे. मग कार्यक्रमांचे कसे होणार व कार्यक्रमांना कोण येणार, असे वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे निवडणूक उरकून घ्या आणि मग कार्यक्रमांचे पाहा, असा सूर व्यक्त होत आहे. कार्यक्रमासाठी निवडणुकीची तारीख नकोच यावर मंडळी ठाम होत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now after the voting, the marriage talk