ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी अखेर मिळाला मुहुर्त!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

रुग्णालयाचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून इमारतीच्या 8 कोटी 50 लक्षच्या बांधकामास राज्य शासनाकडून 14 ऑक्टोबर 2016 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

येवला - गेले अनेक वर्षे चर्चा अन् प्रतीक्षाच ठरलेल्या येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन होण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 6 कोटी 10 लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच या कामाला सुरुवात होणार असून पुढील 24 महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे.

येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने देखणे ग्रामीण रुग्णालयाची इमारत साकारली आहे. या वास्तुचे खुद्द शरद पवार यांनी कौतुक केले होते. त्यानंतर या रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालय करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या रुग्णालयाचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून इमारतीच्या 8 कोटी 50 लक्षच्या बांधकामास राज्य शासनाकडून 14 ऑक्टोबर 2016 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर अनेक वर्षे कामाला सुरवात होण्याची प्रतीक्षा होती. नुकतीच या इमारतीच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन होण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडले आहे.

शहर व तालुक्याचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या विचारात घेता शहर व तालुक्यातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी भुजबळ हे आग्रही होते. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून शहरात 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची सुंदर इमारत उपलब्ध करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर शहर व तालुक्यातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी साठी येवला ग्रामीण रुग्णालयाला 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास पाठपुरावा केला होता. 60 पदे निर्माण होणार!

शहरात उपजिल्हा रुग्णालय होत असल्याने शहराबरोबरच तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर येवला उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकूण 60 नवीन पदे निर्माण होणार आहे. त्यात एक वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, स्त्री व प्रस्तुती रोग तज्ञ, दोन बधिरीकरण शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी
भिसक, बालरोगतज्ञ, एक अस्तीरोग तज्ञ, एक नेत्र शल्यचिकीत्सक, एक दंत चिकित्सक, चार वैद्यकीय अधिकारी अपघात, एक मेट्रन, तीन पीएचएन, याबरोबरच 20 अधिपरिचारिका यांच्यासह एक आहार तज्ञ, दोन रक्तपेढी तज्ञ, दोन प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, एक क्षकिरण विभाग, एक इसीजी तंत्रज्ञ इ. विविध 60 नवीन पदांचा समावेश आहे.

अस्तित्वातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 70 बेडचे वार्ड, अद्ययावत आयसीयु, ऑपरेशन थिएटर, प्रशासकीय विभाग, रक्तपेढी, 
प्रयोगशाळा तर दुसऱ्या मजल्यावर मेडिकल कॅम्प हॉल, ट्रामा केअर युनिट इ. बाबींचा समावेश असेल. मागील मोकळ्या भूखंडामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची धर्मशाळा, कॅटीन तर रूग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट इत्यादींचा समवेश असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नवीन मंजूर 60 पदे भरली जातील तसेच विशेष अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री पुरविली जाणार आहे. या उपजिल्हा रूग्णालयामुळे या भागातील रुग्णांना येथे विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Number Of Beds In Yevala Rural Hospital Increased