बागलाण : भाजपच्या दिलीप बोरसेंचा एकतर्फी विजय| Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

बागलाण विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दिलीप बोरसे हे तब्बल ३३ हजार मताधिक्क्याने निवडून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर त्यांच्या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपिका संजय चव्हाण यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला.

बागलाण: बागलाण विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे दिलीप बोरसे हे तब्बल ३३ हजार मताधिक्क्याने निवडून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर त्यांच्या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपिका संजय चव्हाण यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. शेवटच्या दोन फेऱ्यांची मतमोजणी अद्याप बाकी असतानाच बोरसे यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत विजयी मिरवणूक काढली. इतर उमेदवारांचे मात्र या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आहे. एकूणच या निवडणुकीत झालेल्या सरळ लढतीत भाजपने एकतर्फी विजय मिळविला.

अखेरच मताधिक्क्य बारा हजारांवर 

आज गुरुवारी (ता.२४) रोजी सकाळी आठ वाजता येथील तहसिल कार्यालय आवारातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार भांगरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनच दिलीप बोरसे यांचे मताधिक्क्य दोन ते तीन हजार मतांनी वाढत गेले. पाचव्या फेरी अखेरच मताधिक्क्य बारा हजारांवर जाऊन पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयाची चाहूल लागली होती. (कै.) पं.ध.पाटील चौकात फटाक्यांची आतषबाजी व जयघोषाच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. विजयी मताधिक्क्य मिळाल्यानंतर आमदार.बोरसे यांनी देवमामलेदार श्री.यशवंतराव महाराजांचे दर्शन घेतले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One-sided victory of BJP's Dilip Borse in baglan