पावसाने कांद्याचा वांदा

महेंद्र महाजन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

शेतकऱ्यांपुढील प्रश्‍न
पोळ कांद्यासाठी बाराशे रुपये किलो भावाने मिळणारे बियाणे यंदा सोळाशे रुपये किलो भावापर्यंत पोचले होते. अशा चढ्या भावाने बियाणे घेत शेतकऱ्यांनी रोपे टाकली. मात्र, पावसाने उघडीप न दिल्याने निंदायला वेळ मिळाला नाही. तणनाशक मारणे शक्‍य झाले नाही. त्यातच, पावसाचे पाणी साचत राहिल्याने शेतकऱ्यांच्या रोपांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे देवळ्यातील कांदा उत्पादक यशवंत पाटील यांनी सांगितले.

नाशिक - मॉन्सूनला झालेल्या विलंबामुळे पोळ्यापासून रोपांची पुनर्लागवड होणाऱ्या पोळ कांद्याच्या हंगामाला उशीर झाला. त्यातच, सततच्या पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्याने यंदा पोळ कांद्याचे उत्पादन निम्म्यानं घटण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. तसेच आता रांगड्याची रोपे टाकण्याची वेळ असतानाही शेतातील पाण्यामुळे रोपे टाकण्यात अडचणी येत असल्याने पोळसह रांगडा हंगाम लांबणीवर पडणार आहे.

पोळ कांद्याचे महाराष्ट्रात २५ लाख, तर देशात ६० लाख टनांपर्यंत शेतकरी उत्पादन घेतात. साठवणुकीतील उन्हाळ कांदा बाजारपेठेत येण्याचे प्रमाण मंदावत असताना पोळ कांदा दसरा ते दिवाळीच्या आसपास शेतकरी विक्रीला आणतात. मात्र, सद्यःस्थिती पाहता, पोळ कांद्याची आवक वाढण्यासाठी डिसेंबर उजाडण्याची चिन्हे दिसताहेत. पाऊस वेळेवर न झाल्याने रोपांच्या नुकसानीचे प्रमाण अधिक राहणार असल्याची चिंता कांद्याचे शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे यांनी व्यक्त केली. पोळ कांद्यासाठी जूनच्या पंधरवड्यापासून सुरवात होते. मात्र, त्या वेळी तापमान अधिक राहिल्याने जमीन ओली करून आणि बियाणे ओले करून रोपांची लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर रोपे टाकली. रोपे टाकण्यासाठी दीड महिन्याचा विलंब झाला असताना आता रोपांची पुनर्लागवड करण्याची वेळ आली आणि संततधार पावसाने हजेरी सुरू ठेवली.

त्यामुळे जमिनीत पाणी राहिले आणि रोपे सडून जाण्याचे प्रमाण वाढले. सोग्रस भागामध्ये रोपे पिवळी पडल्याचे दृश्‍य सटाणाकडे जाणाऱ्या मार्गावरून पाहायला मिळते. 

श्रावणातील उन्हाबरोबर खताची मात्रा
ढगाळ हवामान निवळून श्रावणातील उन्हं पडू लागताच, शेतकऱ्यांनी रोपांना खताची मात्रा देण्याचे ठरवले खरे. मात्र, ढगाळ हवामान दूर होण्यास तयार नाही. दरम्यान, उन्हाळ कांद्याचे मध्य प्रदेशात उत्पादन मोठ्या प्रमाणात आले असून, हा कांदा देशभर विक्रीसाठी पाठवला जात आहे. याखेरीज महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, बिहारमध्ये उन्हाळ कांद्याचे उत्पादन अधिक झाले आहे. जूनपासून बाजारात उन्हाळ कांदा विक्रीस येण्यास सुरवात झाली. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात दिवसाला सव्वालाख ते दीड लाख क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे. उन्हाळ कांद्याला क्विंटलला अकराशे ते दीड हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांनी चाळींमधून उन्हाळ कांद्याची साठवणूक केली आहे.

जिल्ह्यात पाच लाख, राज्यात १५ लाख, तर देशात ४० लाख टन कांदा चाळींमध्ये असण्याची शक्‍यता कांद्याचे अभ्यासक चांगदेवराव होळकर यांनी वर्तवली आहे. दुसरीकडे मात्र सध्याच्या पावसाळी आणि ढगाळ हवामानामुळे चाळींमधील कांद्याला कोंब फुटणे, सडणे अशा प्रश्‍नाला सामोरे जावे लागणार असल्याचे डॉ. भोंडे यांनी सांगितले. पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर कांद्याचे भाव वाढण्याचा विश्‍वास शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांना वाटतोय खरे. मात्र, तशी शक्‍यता नसल्याचे होळकर यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion Loss by Rain