उद्योजकाने 'त्याच्या'वर विश्वास ठेवला..अन् दिली गोपनीय माहिती..पण... 

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

बॅंक खाते तात्पुरते सस्पेंड केले जात असल्याचे उद्योजकाला भासविले. नीलेश यांना बंद खात्यात पैसे भरण्याऐवजी दुसऱ्या बॅंक खात्याची माहिती देत त्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यांनी विश्‍वास ठेवून बॅंक खात्यात चार लाख 42 हजार 536 रुपये भरले होते.

नाशिक : शहरातील एका उद्योजकाला त्याचे बॅंके खाते तात्पुरते बंद करण्यात आल्याचे सांगून ते पुन्हा सुरू करण्याचा बहाणा करून घेतलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताने तब्बल साडेचार लाखांना गंडा घातला. दुसऱ्या प्रकारात तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्या बॅंक खात्यातून 40 हजारांची रक्कम काढून घेत गंडा घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दोघांना ऑनलाइन पावणेपाच लाखांना गंडा 
उद्योजक नीलेश पुरुषोत्तम डहाणूकर (रा. कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने 5 ते 21 नोव्हेंबरदरम्यान नीलेश यांच्या ओम साई मोल्डस ऍन्ड प्लॅस्टिक कंपनीच्या ई-मेलवर बनावट ई-मेल ऍड्रेसवरून मेल केला. बॅंक खाते तात्पुरते सस्पेंड केले जात असल्याचे भासविले. नीलेश यांना बंद खात्यात पैसे भरण्याऐवजी दुसऱ्या बॅंक खात्याची माहिती देत त्यात पैसे भरण्यास सांगितले. भामट्याच्या जाळ्यात उद्योजक नीलेश अडकले. त्यांनी विश्‍वास ठेवून बॅंक खात्यात चार लाख 42 हजार 536 रुपये भरले होते. संशयिताने यादरम्यान ही रक्‍कम बॅंक खात्यातून काढून घेतली. ही बाब लक्षात आल्यानंतर नीलेश डहाणूकर यांनी चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. 
 

उद्योजक, तरुणी आमिषाला बळी 
दुसऱ्या घटनेत शहरातील तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून संशयिताने 40 हजारांना गंडा घातला. तरुणीच्या फिर्यादीनुसार, संशयिताने तरुणीला 26 ते 30 नोव्हेंबरदरम्यान वारंवार दूरध्वनी करून तरुणी व तिच्या बहिणीस नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर संशयिताने त्यांची माहिती घेताना बॅंक खात्याचीही माहिती घेतली. त्यानंतर त्याने परस्पर 40 हजार 999 रुपये तरुणीच्या बॅंक खात्यातून काढून घेतले. याप्रकरणी सायबर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Fraud Cyber Crime at Nashik Marathi News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: