सलग पन्नास तास ड्रमवादनाचा थरार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

 सलग ५० तासांहून अधिक वेळ ड्रमवर विविध गाणी वाजविताना विनेश नायरने संगीतप्रेमींची मने जिंकली. सिटी सेंटर मॉल येथे एमएच १५ द बँड यांच्यातर्फे आयोजित तालयात्राच्या तिसऱ्या हंगामात विनेशने ही कामगिरी केली.

नाशिक - सलग ५० तासांहून अधिक वेळ ड्रमवर विविध गाणी वाजविताना विनेश नायरने संगीतप्रेमींची मने जिंकली. सिटी सेंटर मॉल येथे एमएच १५ द बँड यांच्यातर्फे आयोजित तालयात्राच्या तिसऱ्या हंगामात विनेशने ही कामगिरी केली. उपस्थितांनीही सुरेल गाणी सादर करताना त्याला प्रोत्साहन दिले. 

या अनोख्या उपक्रमाला शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पाचपासून सुरवात झाली. याअंतर्गत एक तासाचे विविध संकल्पनांवर आधारित सत्र आयोजित केले होते. गरजू विद्यार्थ्यांसाठी संगीत शाळा उभारण्याच्या प्रमुख उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. 

उपक्रमात विनेश नायर याच्यासह राहुल आंबेकर (व्होकल्स) आणि गणेश जाधव (कीबोर्ड) यांनीही सहभाग नोंदविला होता. रविवारी (ता. २६) विनेशच्या वादनाला ५० तास पूर्ण होत असल्याने या विक्रमी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संगीतप्रेमींनी गर्दी केली होती. उत्स्फूर्तपणे गाणी सादर करताना त्याला प्रोत्साहन देण्यात आले. तालबद्ध वादनाच्या जोडीला सुरेल गीतांची मेजवानी यानिमित्त रसिकांना अनुभवायला मिळाली. या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांहून कलाप्रेमी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Playing drums for fifty hours continuous

टॅग्स