आनंदाला आली भरती...

संतोष विंचू : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नाशिक : गेले ४६ वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले अन गावातून वाहणाऱ्या कालव्याला पाणी आले याचा आनंद अवर्णनीयच म्हणावा लागेल. याचमुळे येवल्यातील दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे पाणी प्रथमच कातरणी शिवारात आल्याने झालेला आनंद पाहून येथील शेतकऱ्यांनी अक्षरशः डीजे लावत ठेका धरून या पाण्याचे जंगी स्वागत केले

नाशिक : गेले ४६ वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरले अन गावातून वाहणाऱ्या कालव्याला पाणी आले याचा आनंद अवर्णनीयच म्हणावा लागेल. याचमुळे येवल्यातील दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे पाणी प्रथमच कातरणी शिवारात आल्याने झालेला आनंद पाहून येथील शेतकऱ्यांनी अक्षरशः डीजे लावत ठेका धरून या पाण्याचे जंगी स्वागत केले.

 मोठ्या मेहनतीने निघाला कालवा 

१९७२ च्या दुष्काळात साकारलेल्या दरसवाडी ते डोंगरगाव पोहोच कालव्याचे काम सध्या बाळापूरपर्यंत पूर्ण झाले आहे. तर तिकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी अडवून ते येवल्यात आणण्यासाठी साकारलेल्या मांजरपाडयाचे पाणी पुणेगाव धरण व तेथून दरसवाडी धरणात पडल्याने सध्या हे दोन धरणे ओव्हरफलो झाले आहेत. पाठीमागून सतत मांजरापाडयाचे पाणी सुरू असल्याने दरसवाडी ते डोंगरगाव कालवा (बाळापूरपर्यत) कालवा प्रवाहित झाला असून मागील गुरुवारी (ता.२१) सोडलेले पाणी येवला हद्दीत येण्याची रात्रंदिवस प्रतीक्षा लागून होती. प्रथमच कालवा प्रवाहित होत असल्याने आणि कामातही सूत्रबद्धता नसल्याने अनेक ठिकाणी चढ-उतार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह शेतकरी येथे तळ ठोकून मशीनच्या माध्यमातून कालवा उकरून प्रवाहित करत आहे. यामुळे काजीसांगवी, विटावे, तळेगाव या भागात कालव्यात चढ लागल्याने मोठ्या मेहनतीने आणि पुढे काढावे लागले. 

पाणी आल्याने स्वप्नपूर्तीचा अवर्णनीय असा आनंद
विटावे येथे तर कालव्यातून बाहेर पाणी जात असल्याने त्याचाही बंदोबस्त करावा लागला तर काळखोडा येथे कालवाही फोडला होता. असे असले तरी एक पोकलेन मशीन पाण्याबरोबर कालव्यात चालू असून जेथे चढ व अडथळे येईल ते दूर करत हे पाणी आज कातरणीच्या शिवारात आले आहे. ४६ वर्ष या कालव्याला पाणी यावे आणि आपल्या भागातील बंधारे नदी-नाले तुडुंब भरून व्हावे ज्यामुळे अवर्षणप्रवण आणि दुष्काळी असलेल्या उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी मिळावी अशी प्रतीक्षा पहिली,दुसरी आणि आता तिसरी पिढीही करत होती. पहिल्या पिढीने पाहिलेले स्वप्न आज तिसऱ्या पिढीने पूर्ण होताना पाहिले असल्याने या पाण्याचा थेंब अन थेंब शेतकरी आपल्या डोळ्यात साठवत आहे.अनेक जण तर गेले दोन दिवस कालव्यासोबत प्रवास करून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होते.
आणी आज येवल्यात पाणी आल्याने स्वप्नपूर्तीचा अवर्णनीय असा आनंद येथील शेतकऱ्यांनी फटाके फोडून,गुलालाची उधळण करून,पाण्याचे पूजन करून आणि डीजेच्या तालावर नाचून व्यक्त केला. हे पाणी बाळापूरपर्यंत येऊन तेथून कातरणी ते बाळापूरच्या दरम्यानचे बंधारे भरून देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pleasure of getting into the canal water for the first time in katarni