पितृछत्र हरपलेला जितेंद्र माळी झाला फौजदार

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 28 एप्रिल 2018

"सामान्य परिस्थितीतून जितेंद्रने मिळविलेले यश हे समाजातील इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. विद्यार्थी म्हणून जितेंद्रला केलेल्या मार्गदर्शनाची त्याला जाणीव आहे. नम्रता हा त्याच्यातील एक चांगला गुण आहे."
- दिलीप पाटकर, सहाय्यक अधिव्याख्याता, तांत्रिक विभाग, आदर्श विद्या मंदिर, निजामपूर-जैताणे.
(जितेंद्रला प्रेरणा देणारे शिक्षक.)

निजामपूर-जैताणे (धुळे) : "समाजात खोटी सहानुभूती दाखविणारे भरपूर असतात पण प्रत्यक्षात मदत करणारे खूपच कमी असतात," अशी अनुभूती आलेल्या संजयनगर, जैताणे (ता.साक्री) येथील रहिवासी व भाजीपाला विकणाऱ्या कल्पनाबाई केशव माळी (बोरसे) या विधवा महिलेच्या मुलाने कठोर परिश्रमातून नुकतीच फौजदार पदापर्यंत मजल मारली. सद्या त्याचे नाशिक येथे प्रशिक्षण सुरु असून त्या प्रेरणादायी युवकाचे नाव आहे जितेंद्र केशव माळी (बोरसे).

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी पितृछत्र हरपलेल्या जितेंद्रची ही यशोगाथा. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत, पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर धुळे येथून आयटीआय पूर्ण केले. दरम्यान मुक्त विद्यापीठातून बी. ए. उत्तीर्ण केले. सन २००८ मध्ये नाशिक पोलिसदलात दाखल झालेल्या जितेंद्रला फौजदार होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर २०१६/१७ मध्ये झालेल्या खात्यांतर्गत परीक्षेत तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याने विधवा आईसह लहान भाऊ व आजीचेही स्वप्न पूर्ण केले.

कल्पनाबाईचे सासर शिरपूरचे तर माहेर जैताणे येथील. त्यांना दोन मुले. मोठा जितेंद्र, तर लहान नितीन. जितेंद्र अवघा आठ वर्षांचा, तर नितीन फक्त सहा महिन्याचा असताना त्यांच्या पतीचे अकाली निधन झाल्याने तरुण वयात मुलांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यानंतर कल्पनाबाईने माहेरचा आधार घेतला. आई गोकुळबाई वामन सूर्यवंशी यांनी आपल्या एकुलत्या मुलीला सावरले. गोकुळबाईंना मुलगा नसल्याने त्यांनी मुलीलाच मुलगा मानले. त्या स्वतःही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत असल्याने मुलीलाही मदतीला घेतले. निजामपूर-जैताणेचा आठवडे बाजार, दैनंदिन भाजी बाजारात त्या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करू लागल्या. माळमाथा परिसरातील इतर गावांच्या आठवडे बाजारातही त्या भाजीपाला विक्री करू लागल्या. कधी कधी भाजीपाला विक्रीत तोटाही येत होता. तरीही न खचता, न डगमगता त्यांनी काबाडकष्ट करून व पोटाला चिमटे देऊन मुलांना शिकविले.

जितेंद्रनेही आईचे कष्ट वाया जाऊ दिले नाही. तोही बारावीपर्यंत मिळेल ती छोटीमोठी कामे करायचा. सन २००३ मध्ये दहावी तर २००५ मध्ये तो बारावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर २००८ मध्ये त्याने धुळे येथून आयटीआयही पूर्ण केले. त्याच वर्षी तो नाशिक पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाला. दरम्यान त्याने मुक्त विद्यापीठातून पदवीही मिळवली. सेवेत रुजू झाल्यानंतर त्याने पोलिस उपनिरीक्षक व्हायचे ठरवले. नोकरी सांभाळून वेळ मिळेल तेव्हा रात्री-पहाटे अभ्यास करू लागला. पहिल्या प्रयत्नात यशाने हुलकावणी दिल्यानंतर मात्र दुसऱ्याच प्रयत्नात तो 'फौजदार' झाला. सद्या त्याचे नाशिकलाच प्रशिक्षण सुरू आहे. जितेंद्रला पाच वर्षांचा एक मुलगाही आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेयआपल्या कुटुंबियांसह गुरुजनांना दिले आहे. शाळा व गावाप्रतीही त्याने ऋण व्यक्त केले आहे. त्याचे समाजबांधवांसह मित्रपरिवाराने सोशलमीडियावरून अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जितेंद्रच्या सत्काराचे नियोजनही गावकऱ्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police sub inspector jitendra mali success story