कार्यकर्त्यांचे कौतुक करावे की सांत्वन; राजकीय पुढाऱ्यांसमोर पेच 

जगदीश शिंदे
Thursday, 21 January 2021

मतदानावरून गावकी आणि भावकीच्या वादात माणुसकीचा पराभव होऊ नये, अशी अपेक्षा निवडणूक झालेल्या प्रत्येक गावातील सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

साक्री : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींचा जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम हा नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध होत, ४० ग्रामपंचायतींसाठीचा मतदानाचा निकाल सोमवारी जाहीर होऊन संपला. मात्र एकाच राजकीय पक्षाचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या पॅनलमध्ये निवडणुका होताना, गावपातळीवर विजयी होणाऱ्या उमेदवारांचे कौतुक अन् पराभव पत्करणाऱ्या उमेदवाराचे सांत्वन नेमके कसे करावे? हा मोठा पेच तालुक्यातील राजकीय धुरिणांसमोर उभा आहे.

आवश्य वाचा- शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; चिमठाणे परिसरातील शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्याने लावला कोटीचा 'चुना '
 

अर्थात, अशी परिस्थिती मतदारांनी दिलेल्या कौलातून समोर उभी ठाकली आहे. यातील वाद व शह-काटशहाचे राजकारण संपुष्टात येत गावाच्या भल्यासाठी पावले उचलली जाण्याची अपेक्षा यानिमित्ताने असली तरी लक्ष्मीदर्शनावर ही निवडणूक गेल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. 

तालुक्यात निजामपूर, जैताने, दुसाने, म्हसदी, मालपूर, कावठे, दिघावे, छडवेल (प.) आदी प्रमुख गावांचा समावेश होता. या गावांतील निवडणुकीचा निकाल अनपेक्षित अर्थात, गावकीवर गेलेला अनुभवास येत असून, झालेल्या मतदानावरून गावकी आणि भावकीच्या वादात माणुसकीचा पराभव होऊ नये, अशी अपेक्षा निवडणूक झालेल्या प्रत्येक गावातील सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रथमच ग्रामपंचायत पॅनल देणाऱ्या विविध पॅनल प्रमुखांनी पक्षश्रेष्ठींचा आधार घेत अमुक एका पक्षाकडून आम्ही निवडणूक लढवत आहोत, असा दावा केला. हा दावा अर्थात, अखेरपर्यंत किती खरा ठरणार? याचे उत्तर काळ देणार असला, तरी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून संबंधित ग्रामपंचायतीवर आमचेच वर्चस्व, असा दावा करण्यात येत आहे.

 

यात तालुक्यातील मोठ्या गणल्या जाणाऱ्या निजामपूर ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचे वर्चस्व असल्याचे चित्र दिसत आहे. तर लागूनच असलेल्या जैताने, मलांजन आणि म्हसदी, अंबापूर, दिघावे ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता असल्याचा दावा होत आहे. तर मालपूर, शेणपूर, महीर, शेवाळी (दा.), ककाणी (भ.), राजबाई-शेवाळी आणि छडवेल (प) या ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आल्याचे चित्र दिसत आहे. 

आवर्जून वाचा- एका मताची जादू चालली; भाजपकडे येणारी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे गेली
 

तालुक्यातील इतर गावांत झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवारांवर दावा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले असले तरी, यात तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात तीन पक्ष एकत्र येत प्रभावी ठरणारी महाविकास आघाडी तर इतरत्र भाजपप्रणीत सदस्यांची संख्या अधिक असल्याचा अंदाज आहे. यातील अनेक गावांत यापूर्वी सत्ता असलेल्या धुरिणांना पराभवाचे तोंड पाहावे लागल्याचे चित्र सध्या आहे. तर नवीनच सदस्यरूपी सत्तेपर्यंत पोचणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आपल्या हातून गावविकासासाठी होणाऱ्या कामांवर अधिक भर द्यावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी गावाच्या भल्यासाठी एकत्र येत निवडणुकीतील राग, द्वेष आणि लोभ विसरून गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांना सोबत घेत आपले योगदान द्यावे, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political marathi news sakri Problems leaders appreciate activists