तारखेवर हजर करत नाही म्हणून कैद्याचा स्वतःवर वार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या कैद्याने न्यायालयात तारखेवर हजर करत नाही म्हणून कारागृह अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी धातूच्या पत्र्याने स्वतःच्या हातावर ओरखडे मारून घेत जखमा करून घेतल्याची घटना कारागृहात घडली.

जळगाव - खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या कैद्याने न्यायालयात तारखेवर हजर करत नाही म्हणून कारागृह अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी धातूच्या पत्र्याने स्वतःच्या हातावर ओरखडे मारून घेत जखमा करून घेतल्याची घटना कारागृहात घडली. 

रामानंदनगर पोलिस ठाण्यात राजीवगांधी नगरातील खूनप्रकरणी रवीसिंग मायासिंग बावरी, सत्यासिंग मायासिंग बावरी व मलीनसिंग मायासिंग बावरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. खुनानंतर फरार झाल्यावर त्यांना अटक झाली होती. वर्ष 2017 पासून हे तीनही भाऊ न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात आहेत. 

काय घडला प्रकार 
बंदिवान रवीसिंग बावरी यांच्या दोन्ही भावांची जिल्हा न्यायालयात तारीख होती. मात्र बावरी बंधूंना न्यायालयात हजर करणेकरीता मागणीप्रमाणे कुणीही पोलिस पथक न आल्याने त्याला हजर ठेवता आले नाही. न्यायालयात हजर न केल्याचा संतापात दुपारी रवीसिंग बावरी याने लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने दोन्ही हातावर वॉर करण्यास सुरवात केली. कारागृह कर्मचाऱ्याच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्यावर कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. 

गार्ड न मिळाला नाही 
कैद्यांना न्यायालयात तारखेवर हजर करण्यापूर्वी पोलिस विभागाला गार्ड म्हणून कर्मचारी मिळावे म्हणून पत्रव्यवहार करण्यात येतो. त्यानुसार आज बावरी यांच्यासह ज्या कैद्यांना न्यायालयात हजर करावयाचे होते. त्यासाठी 1 ऑक्‍टोबरला पत्र देण्यात आले. तरीही 3 ऑक्‍टोबरला एक वाजेपर्यंत कुठलेही गार्ड म्हणून कर्मचारी आले नाही. पोलिस पथक नसल्याने पोलिस मुख्यालयाकडून आलेल्या कर्मचाऱ्यामार्फत कैद्याचे रिमांड वॉरंट तारीख वाढविणे कामी न्यायालयात पाठविण्यात आले होते. 

पोलिसांत गुन्हा दाखल 
शासकीय कामात अडथळा निर्माण करत कारागृहातील सुरक्षा व शिस्तीत बाधा आणून कारागृहीन नियमांचे उल्लंघन केले तसेच कारागृह प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रविसिंग मायासिंग बावरी यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कारागृहातील हवालदार विजय निकम याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस विभागाला एक ऑक्‍टोबरला न्यायालयात हजर करावयाचे बंदीकरीता पोलिस पथकाच्या मागणीचे पत्र देण्यात आले होते. मात्र मागणीनुसार पथक न आल्याने बावरी यांना हजर करता आले नाही. त्यामुळे रविसिंग बावरीने ते स्वतःवर काहीतरी तीक्ष्ण पत्र्याने वॉर केले. वरिष्ठांना तसेच न्यायालयात याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. 
- अनिल वांढेकर, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prisoner blow on self for court date