एक लाख कोटींचा खड्डा 

महेंद्र महाजन 
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात जवळपास एक लाख कोटींचा खड्डा पडला आहे. 

नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात जवळपास एक लाख कोटींचा खड्डा पडला आहे. 

सोलापूर आणि बीड जिल्हा पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा कमी पर्जन्याचा राहिला. नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पर्जन्यमान 50 ते 75 टक्‍क्‍यांपर्यंत मर्यादित राहिले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात 75 ते 100 टक्‍क्‍यांपर्यंत पर्जन्यमान झाले. प्रत्यक्षात राज्याच्या सरासरीच्या 73.6 टक्के पाऊस गेल्या महिनाअखेरपर्यंत झाला. पीक वाढीच्या अवस्थेत पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पिकांना दणका बसला आहे. भाताला लोंब्या उगवल्या; पण दाणे भरले नाहीत. अनेक भागांत पीक हाती लागत नसल्याने जनावरांसाठी उपयोग केला गेला. अशातच नैसर्गिक आपत्तीमुळे दीड लाख हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 47 हजार, चंद्रपूरमधील 11 हजार 161, नांदेडमधील 71 हजार 349, जळगावमधील 254, गडचिरोलीमधील 10 हजार, नंदूरबारमधील 645, साताऱ्यामधील 318 आणि सांगलीमधील 409 हेक्‍टरचा समावेश आहे. कापूस, सोयाबीन, तूर, भात, कांदा, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, भूईमूग, मका, वाटाणा, घेवडा, पावटा या पिकांना दणका बसला आहे. 

रब्बीची 13 टक्के पेरणी 
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र 56 लाख 93 हजार हेक्‍टर इतके असून, आतापर्यंत अवघ्या 13 टक्के क्षेत्रावर म्हणजेच सात लाख 59 हजार हेक्‍टरवर रब्बीच्या पेरण्या उरकल्या आहेत. पाण्याच्या उपलब्धतेवर गव्हाची पेरणी केली जात असली, तरीही गव्हाचे क्षेत्र वाढण्याचे चित्र अंधूक बनले आहे. रब्बीमधील ज्वारीचे क्षेत्र वाढीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. उपलब्ध पाण्यावर 18 टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. गव्हाचे क्षेत्र एक टक्का आहे. मक्‍याची 10, हरभऱ्याची 16, करडईची पाच, जवसाची एक, तिळाची दोन तर सूर्यफुलाची तीन टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 15 लाख 13 हजार हेक्‍टरवर पेरण्या झाल्या होत्या. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 50 टक्‍क्‍यांवर पेरणी होऊ शकली आहे. त्यात पुन्हा पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यावर त्याचा उपयोग उत्पादनाऐवजी जनावरांसाठी करावा लागण्याची शक्‍यता अधिक आहे. 

खरिपातील उत्पादन 
(आकडे लाख टनांमध्ये) 

पीक 2017-18 चौथा अंदाज 2018-19 
धान्य 67.63 59.74 
डाळी 14.68 13.77 
अन्नधान्य 82.31 73.51 
तेलबिया 41.62 46.25 
(यंदाचे उत्पादन तात्पुरते स्वरूपाचे आहे. पावसाअभावी बसलेल्या फटक्‍यामुळे आणखी घट शेतकऱ्यांना सोसावी लागणार आहे.) 

रब्बी हंगामाची स्थिती 
(आकडे हेक्‍टरमध्ये) 
पीक 2017-18 पेरणी यंदाची पेरणी 
ज्वारी 9 लाख 79 हजार 4 लाख 75 हजार 
गहू 30 हजार 735 12 हजार 214 
मका 50 हजार 406 21 हजार 558 
हरभरा 4 लाख 32 हजार 2 लाख 41 हजार 
करडई 8 हजार 57 4 हजार 482 
जवस 486 200 
तीळ 46 24 
सूर्यफूल 1 हजार 955 1 हजार 314 
(गेल्या वर्षी मिळालेले उत्पादन आणि बाजारभावाचा विचार करता कृषी क्षेत्रातून 15 हजार कोटींचे उत्पन्न मिळाले होते.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: production has started to decline due to the increase in kharif crops Due to lack of rainfall