जळगावातील रखडलेले प्रकल्प कमी कालावधीत मार्गी लावणार : गिरीश महाजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

सिंचन प्रकल्पावर आपला अधिक भर असेल, असे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात बोलताना सांगितले.

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत. प्रकल्प कमी कालावधीत अतिशय वेगाने मार्गी लावण्यावर भर असेल. याकरीता सिंचन प्रकल्पावर अधिक भर असेल; जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे सांगितले.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकड़े आल्यानंतर ते प्रथमच जळगाव जिल्ह्यात आज दुपारी दाखल झाले. त्यांचे रेल्वेस्थानकावर ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत असंख्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे. महापौर सीमा भोळे, उद्योजक श्रीराम खटोड़ यासह असंख्य भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री  महाजन बोलत होते. ते म्हणाले, की जळगाव शहरात एक वर्षात कायापालट करण्याचे मी सांगितले होते; सध्या जळगाव शहरात अमृत योजनेचे काम सुरू असल्याने रस्त्यांची कामे रखडली आहेत. गटारी व अमृत योजनेचे काम मार्गी लागताच शहरातील रस्ते चकाचक केले जातील. सिंचनाच्या प्रकल्पांना अधिकाधिक प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. जळगाव जिल्हा माझा आहे; आतापर्यंत मी नाशिक नंदुरबारचा पालकमंत्री होतो. मात्र जळगाव जिल्हा माझा असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्याचा आनंद वेगळा असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The projects in Jalgaon will be implemented in less time says girish mahajan