Vidhan Sabha 2019 : मालेगावात प्रचाराचे रण तापले; विरोधक एकमेकांना भिडले 

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी निवडणुकीत खरी लढत कॉंग्रेसचे उमेदवार आमदार आसिफ शेख व एमआयएमचे उमेदवार माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्यात होणार आहे. मंगळवारी (ता. 8) भ्रष्टाचाराचे पुरावे दाखविण्यासाठी येथील खैबान निशात चौकात झालेल्या पंचायतीत (चौपाल सभा) कॉंग्रेस व एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रचंड पोलिस बंदोबस्त असल्याने अनर्थ टळला. 

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी निवडणुकीत खरी लढत कॉंग्रेसचे उमेदवार आमदार आसिफ शेख व एमआयएमचे उमेदवार माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्यात होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक प्रचाराचे रण मालेगाव मध्यमध्ये तापले आहे. 

विकासकामांचा मुद्दा बाजूला, वैयक्तिक टीकाटिप्पणी सुरू
निवडणूक प्रचारात विकासकामांचा मुद्दा बाजूला पडला असून, वैयक्तिक टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. प्रचारात भ्रष्टाचार व तोडीबाज हे दोन शब्द परवलीचे झाले आहेत. कॉंग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप एमआयएम करीत आहे. याउलट कॉंग्रेसचे नेते एमआयएमच्या नेते व पदाधिकाऱ्यांवर तोडीबाजीचा आरोप करीत आहेत. मंगळवारी (ता. 8) भ्रष्टाचाराचे पुरावे दाखविण्यासाठी येथील खैबान निशात चौकात झालेल्या पंचायतीत (चौपाल सभा) कॉंग्रेस व एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रचंड पोलिस बंदोबस्त असल्याने अनर्थ टळला. 

घोषणाबाजीवरच युद्धविराम झाला. 
आमदार आसिफ शेख यांनी "पाच साल बेमिसाल' ही कार्यपुस्तिका वाटून दोन महिन्यांपूर्वीच प्रचाराचा धुरळा उडवून दिला. घरोघरी त्यांनी केलेल्या कामकाजाची पुस्तिका पोचवली. याउलट मौलाना मुफ्तींच्या उमेदवारीबाबत संदिग्धता होती. एमआयएममध्ये प्रवेश व उमेदवारीनिश्‍चिती झाल्यानंतर त्यांचे समर्थक जोमाने कामाला लागले. पूर्वाश्रमीचे एमआयएमचे नेते युनूस ईसा कुटुंबीयांचे बळही त्यांना मिळाले. सोबतीला कॉंग्रेसवर टीका-टिप्पणी करण्यासाठी जनता दलाचे मुश्‍तकिम डिग्निटी व निवडक समर्थक आहेतच. कॉंग्रेसच्या प्रचारात नगरसेवकांची मोठी फौज असते. शहरातील दखनी-मोमीन वाद लक्षात घेता आमदार शेख यांनी अन्सारी (मोमीन) मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. दखनी मते त्यांची हक्काची आहेत. मोमीन मतदार मौलाना मुफ्तींच्या पाठीशी आहेत. भाजपच्या उमेदवार नगरसेविका दीपाली वारुळे या नामधारी असल्या, तरी कॉंग्रेसला त्याचा काही प्रमाणात फटका बसेल. याउलट आवामी पार्टीचे अपक्ष उमेदवार व लक्षवेधी आंदोलने करून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारे रिजवान बॅटरीवाला मौलाना मुफ्ती यांच्यासाठी काही प्रमाणात डोकेदुखी ठरणार आहेत. रिजवान बॅटरीवाला हे कॉंग्रेसच्या महापालिकेतील कारभारावर सातत्याने टीकास्त्र सोडतात. आमदार शेख विरोधकांची म्हणजेच मौलाना मुफ्ती यांची मते त्यांच्याकडे काही प्रमाणात झुकतील. प्रचारात विकासकामांवर कमी भर दिला जात आहे. महापालिकेतील कारभार, रस्त्यांची स्थिती, उड्डाणपुलाचे संथ गतीने सुरू असलेले काम, नवीन वसाहतीतील रस्ते, पाणी व शौचालयांचा प्रश्‍न याबरोबरच म्हाळदे शिवारातील घरकुलांचा मुद्दाही प्रचारात अग्रभागी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Propaganda war raged in Malegaon; Opponents flocked to each other