सटाणा बाजार समिती सभापती सोनवणे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

बाजार समिती सभापती सौ. सोनवणे हे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कट्टर समर्थक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे काम केले नाही अशी धारणा निवडक भाजप समर्थक संचालकांमध्ये तयार झाल्याने हा अविश्वास ठराव आणल्याचे बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे यांच्या विरुद्ध अखेर बारा संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. अचानक दाखल झालेल्या या अविश्वास प्रस्तावामुळे तालुक्यात एकच राजकीय खळबळ निर्माण झाली आहे.

बाजार समिती सभापती सौ. सोनवणे हे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कट्टर समर्थक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे काम केले नाही अशी धारणा निवडक भाजप समर्थक संचालकांमध्ये तयार झाल्याने हा अविश्वास ठराव आणल्याचे बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बाजार समितीच्या बारा संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावात नमूद केलेआहे की, शेतकरी बांधवांचे कृषी उत्पन्नाचे खरेदी विक्री बाबत नियमन करणे, शेतमालाला योग्य भाव देऊन विक्री केलेल्या मालाची अदायगी योग्य रीतीने करणे यासाठी संचालक मंडळाचा आग्रह असतो. मात्र व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करूनही विक्री किंमत अदा केलेली नाही अशा व्यापाऱ्यांविरुद्ध सभापतींनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याचे अविश्वास ठरवात म्हटले आहे.

सभापतींनी नियमाप्रमाणे व मंजूर उपविधीप्रमाणे काम करणे अभिप्रेत असताना  सभापतींचे पती प्रवीण सोनवणे हे संचालक मंडळ सभेस उपस्थित राहून संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करतात. यामुळेच सोनवणे यांच्यावर अविश्वास ठराव आणत असल्याचे म्हटले आहे. सभापती मंगला सोनवणे या संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानीप्रमाणे बाजार समितीचे कामकाज करतात. विषय पत्रिकेनुसार विषयांवर चर्चा न करता मनमानी पद्धतीने निर्णय घेतात तसेच विषय पत्रिकेतील विषयांव्यतिरिक्त अन्य विषयांवर देखील निर्णय घेतल्याचे दर्शवून परस्पर इतिवृत्तद्वारे ठराव मंजूर झाल्याच्या नोंदी इतिवृत्तात करतात. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर संचालकांनी सभेत संबंधित विषयांवर केलेले मतप्रदर्शन अथवा विरोध रीतसर नोंदवून घेतले जात नाही. संस्थेच्या मंजूर उपविधी प्रमाणे शेतकरी हिताच्यात सुख सुविधा निर्माण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत अथवा त्या अनुषंगाने निर्णय घेतले जात नाहीत. यामुळे प्रस्तुत संचालक मंडळ हे सदर पत्रान्वये नमूद केलेल्या सभापती मंगला सोनवणे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करीत आहेत असेही ठरावात नमूद केले आहे.

अविश्वास ठराव साठी आवश्यक असलेल्या बारा संचालकांनी प्रस्तावावर सह्या केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या मागणीनुसार विहित मुदतीत विशेष सभा आयोजित करून योग्य या कामी कारवाई करणे आवश्यक असल्याचे अविश्वास प्रस्तावात नमूद आहे.

अविश्वास प्रस्तावावर संचालक संजय देवरे, पंकज ठाकरे, प्रकाश देवरे, नरेंद्र अहिरे, प्रभाकर रौंदळ, मधुकर देवरे, संदीप साळे, सरदारसिंग जाधव, संजय सोनवणे, रत्नमाला सूर्यवंशी, रेणूबाई माळी, सुनिता देवरे या बारा संचालकांच्या सह्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the protest against Sitana Market Committee Chairman Mangala Sonawane filed a no confidence motion