फौजदाराच्या पत्नीची डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या ;गडचिरोलीतील घटना ; कौटुंबिक वाद विकोपाला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 मे 2020

गडचिरोली पोलिस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीस दिल्यानुसार, उपनिरीक्षक धनराज शिरसाठ मुलचेरा (गडचिरोली) येथे तैनात असून आजच पोमके येथे नक्‍क्षल विरोधी अभियानावरुन परतले होते. त्यानंतर ते, घरी पोचल्यावर आई-वडिलांसह मौजे मुलचेरा येथे खासगी कामासाठी गेले असताना पत्नी संगीता शिरसाठ दोन्ही मुलांसह घरात एकट्याच होत्या. आज दुपारी साडे बारा ते 1 वाजेच्या सुमारास संगीता यांनी पतीच्या सर्विस रिव्हॉल्वर मधून स्वत:वर गोळी झाडून घेतली.

जळगाव, ता. 7 :- मुसळी(ता.धरणगाव) येथील उपनिरीक्षक धनराज बाबूलाल शिरसाठ(वय-34) नक्‍शल प्रभावित गडचिरोलीत मुलचेरा येथे कार्यरत आहे. आज दुपारी त्यांची पत्नी संगीताने सर्विस रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान पती धनराज बागूल यानेच पत्नीवर दोन गोळ्या झाडल्याची माहिती माहेरी जळगाव येथे मिळाल्यानंतर माहेरची मंडळी गडचिरोली येथे रवाना झाली आहे. सात वर्षीय भार्गवीने आईच्या माहेरी फोन करून माहिती दिल्याचे सांगण्यात आले. पती पत्नीत गेल्या वर्षभरा पासून कौटुंबिक वाद सुरू होता. वाद सोडवण्यासाठी धनराजचे आई-वडील गडचिरोली येथे गेले होते. 

शहरातील लक्ष्मीनगर येथील माहेररहिवाशीण संगीता यांचा विवाह मुसळी (ता.धरणगाव) येथील धनराज बाबूलाल शिरसाठ यांच्याशी झाला आहे, वर्ष-2006 मध्ये मुंबईच्या पोलिस भरतीत धनराज शिरसाठ यांची निवड झाली. तेथून जिल्हाबदली अंतर्गत जळगावी आल्यावर शहर पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते.तद्‌नंतर वर्ष-2017 मध्ये खातेनिहाय परीक्षा उत्तीर्ण होऊन ते उपनिरीक्षक झाले, पहिलीच पोस्टिंग खडतर सेवेची नक्‍क्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागाअंतर्गत असलेल्या मुलचेरा पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. ते पत्नी संगीता, मुलगी भार्गवी(वय-9), मुलगा शिवम (वय-4) अशा कुटुंबासह गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा येथे पोलिस वसाहतीत वास्तव्यास होते. वर्षभरापासून पती-पत्नीत वाद सुरू असल्याने संगीता माहेरी वडिलांना फोन वरून माहिती देत होती. मुलीला त्रास होत असल्याने जावयाची समजूत काढावी यासाठी वडिलांनी धनराज शिरसाठ यांच्या आई-वडिलांची भेट घेत विनंतीही केली होती. आई व वडिलांना मुलगा धनराज याची समजूत काढण्याचे सांगितल्याने लॉकडाऊनपूर्वीच धनराज याचे वडील बाबूलाल नामदेव शिरसाठ व आई सुशीला शिरसाठ असे दोघेही मुलचेरा येथे गेले होते. 

स्वत:च गोळी झाडली.. 
गडचिरोली पोलिस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीस दिल्यानुसार, उपनिरीक्षक धनराज शिरसाठ मुलचेरा (गडचिरोली) येथे तैनात असून आजच पोमके येथे नक्‍क्षल विरोधी अभियानावरुन परतले होते. त्यानंतर ते, घरी पोचल्यावर आई-वडिलांसह मौजे मुलचेरा येथे खासगी कामासाठी गेले असताना पत्नी संगीता शिरसाठ दोन्ही मुलांसह घरात एकट्याच होत्या. आज दुपारी साडे बारा ते 1 वाजेच्या सुमारास संगीता यांनी पतीच्या सर्विस रिव्हॉल्वर मधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. फायरींगचा आवाज झाल्याने मुलगी भार्गवी पळत सुटली, शेजाऱ्यांसह कर्मचारी अधिकाऱ्यांनी धाव घेत जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे हलवले तपासणी अंती डॉक्‍टरांनी त्यांना मयत घोषित केले. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत असल्याचे जनसंपर्क प्रमुख प्रशांत दिवाते यांनी कळवले. 

मुलीने मामा केला केला फोन.. 
घटना घडल्यानंतर सातवर्षीय भार्गवीने जळगावी मामा गणेश सपके यांना फोन करून..पप्पाने मम्मीला गोळी मारली..अशी माहिती दिल्याचे माहेर वासीयांचे म्हणणे आहे. मुलचेरा(गडचिरोली) येथील नातेवाइकांना संपर्क करून खात्री करण्यास व मदतीला जाण्याची विनंती केली, मात्र लॉकडाऊन मुळे जाता येणे शक्‍य नसल्याने त्यांनाही अडचणी आल्यात. 

माहेरची मंडळी मुलचेराकडे रवाना 
घटनेची खात्री झाल्यावर संगीता यांच्या माहेरच्या मंडळींनी तातडीने गडचिरोली निघण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याची सीमा ओलांडता येणार नसल्याने सपके कुटुंबीयांनी शासकीय परवानगी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. परवानगी मिळाल्यानंतर दुपारनंतर ही मंडळी खासगी वाहनाने गडचिरोलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: psi's wife commits suicide by shooting herself in the head; incident in Gadchiroli