खरिपानंतर रब्बीही दुष्काळी वणव्यात 

खरिपानंतर रब्बीही दुष्काळी वणव्यात 

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून खरिपाच्या पेरण्यांना सुरवात झाली, पण 30 टक्‍क्‍यांहून अधिक दणका उत्पादनाचा बसला. त्यानंतर आता रब्बीच्या 27 टक्केच पेरण्या झाल्या असून, त्या पिकांचीही शाश्‍वती उरलेली नाही. 

केंद्रीय पथक मुक्कामी 
पिण्याच्या पाण्याच्या समस्येने डोके वर काढले असून नाशिक जिल्ह्यातील टॅंकरने शंभरी पार केलीय. उत्तर महाराष्ट्रात 260 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उद्या (ता. 5) जळगावमध्ये मुक्कामी येऊन गुरुवारपासून जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देणाऱ्या केंद्रीय पथकाला चाऱ्यापासून पिण्याच्या पाण्याच्या व्यथेला सामोरे जावे लागेल. केंद्राच्या दहा अधिकाऱ्यांची तीन पथके करण्यात आली आहेत. त्यातील एक पथक उत्तर महाराष्ट्राची पाहणी करणार आहे. केंद्राच्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश असेल. 

फळबागांपुढे मोठे संकट 
खरिपाचे उत्तर महाराष्ट्रात सर्वसाधारण 27 लाख 16 हजार 300 हेक्‍टर क्षेत्र असून 26 लाख 35 हजार 75 हेक्‍टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यात सर्वाधिक 35 टक्के कापसाचे क्षेत्र असून, वाढीच्या अवस्थेत कापसाला अपेक्षित पाणी न मिळाल्याने एक ते दोन वेचण्यांवर कापसाच्या पळकाट्या काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. बाजरी, मका, ज्वारी, भात, नागली या तृणधान्यांची 86, मूग, उडीद, तूर या कडधान्याची 138, तर सोयाबीन, भुईमूग, खुरासणी या तेलबियांची 111, कापसाची 104 टक्के क्षेत्राचा पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये समावेश आहे. उसाची आतापर्यंत 43 टक्के लागवड झाली आहे. म्हणजेच, पाण्याच्या उपलब्धतेअभावी ऊस लागवड आणि केळी, डाळिंब, द्राक्ष बागांप्रमाणेच भाजीपाला क्षेत्रापुढे संकट उभे ठाकले आहे. पावसाने दडी मारल्याने दाणे भरणे, फुलोऱ्याच्या अवस्थेत खरिपाच्या पिकांना पाणी मिळालेले नाही. 

रब्बीत अत्यल्प पेरण्या 
उत्तर महाराष्ट्रात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र 10 लाख 97 हजार 778 हेक्‍टर असून यंदा आतापर्यंत 2 लाख 92 हजार 618 हेक्‍टर म्हणजेच 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत 5 लाख 93 हजार 127 हेक्‍टर म्हणजेच, 55 टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या होत्या. गेल्यावर्षीच्या रब्बीमध्ये 83 टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये ज्वारीचे 31, गव्हाचे 30, हरभऱ्याचे 26, मक्‍याचे 19 टक्के क्षेत्र आहे. पाण्याच्या उपलब्धतेअभावी जमिनीत ओल नसल्याने शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी धजावले नाहीत. आता पाणीच उपलब्ध नसल्याने रब्बीची अवस्था असून नसल्यागत झाली आहे. 

पर्जन्याची तुलनात्मक स्थिती 
(आकडे टक्केवारीमध्ये) 
जिल्हा यंदाचा पाऊस गेल्यावर्षीचा पाऊस 
नाशिक 58.8 93.40 
धुळे 71.4 98.60 
नंदूरबार 57.6 88.70 
जळगाव 61.50 74.70 
नगर 64.20 144.80 
उत्तर महाराष्ट्र 60.10 96.30 

मुंबईत शुक्रवारी बैठक 
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय तीन पथकांचा दौरा गुरुवारपर्यंत (ता. 6) पूर्ण होणार आहे. त्यादिवशी उत्तर महाराष्ट्रातील पथक नाशिकमध्ये मुक्कामी थांबणार आहे. शुक्रवारी (ता. 7) मुंबईत दुष्काळी परिस्थितीसंबंधीची बैठक होईल. या बैठकीसाठी राज्यातील तीनही पथकातील केंद्राचे अधिकारी सहभागी होणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com