esakal | शिधापत्रिकाधारकांना धान्यासोबतच आता 'एसएमएस'
sakal

बोलून बातमी शोधा

शिधापत्रिकाधारकांना धान्यासोबतच आता 'एसएमएस'

शिधापत्रिकाधारकांना धान्यासोबतच आता 'एसएमएस'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक - शिधापत्रिका लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य दरमहा मिळते की नाही, याच्या तपासणीसाठी पुरवठा विभागातर्फे 7 ते 14 नोव्हेंबरदरम्यान अन्न सप्ताह होणार आहे. धान्याची उचल करूनही ते काळ्याबाजारात वितरण करण्यास चाप लावण्यासाठी त्या त्या भागातील 100 शिधापत्रिकाधारकांना मोबाइलवर एसएमएस मिळतील, अशी यंत्रणा पुरवठा विभाग तयार करणार आहे. 

येत्या एक डिसेंबरपासून प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेच्या आत धान्य उचल न केल्यास अर्धी किंवा पूर्ण अनामत रक्कम जप्ती, इतकेच नव्हे, तर परवाना रद्दसारखी कारवाई रेशन दुकानांवर करण्यात येणार आहे. गोदामांमधून उचललेल्या धान्याचे पुढील दोन-तीन दिवसांत वाटप करणे पुरवठा विभागाला अपेक्षित आहे. म्हणूनच प्रत्येक महिन्याची सात तारीख अन्न दिन म्हणून, तर 7 ते 14 हा अन्न दिन सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आदेश राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाने दिले आहेत. 

पुरवठा निरीक्षक, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेशन दुकानांत जाऊन तेथे उपलब्ध धान्य, तसेच वितरण व्यवस्थेची तपासणी करावी, असे या आदेशात म्हटले आहे. पुरवठा विभागाने गेल्या महिन्यापासून अशा तपासणीला सुरवात केली आहे. अशाच तपासणीबाबत जिल्ह्यातील तहसीलदारांनाही सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी सोमवारी दिली. यामुळे गरजू लाभार्थी शोधण्यासही मदत होईल, असा विश्‍वास श्रीमती नरके यांनी व्यक्त केला. 

रेशन दुकानदाराने सरकारी धान्य उचलताच त्याच्या कार्यक्षेत्रातील किमान 25 शिधापत्रिकाधारकांना एसएमएसद्वारे माहिती मिळेल, अशी व्यवस्था आहे. अधिकाधिक शंभर लोकांना पुरवठा विभाग एसएमएस करू शकणार आहे. त्यामुळे धान्य उचल केली असेल, तर अद्याप धान्य आलेले नाही, अशी बतावणी संबंधित रेशन दुकानदार करू शकणार नाही.

loading image