नाशिक : वसुली पथकाला शेतकऱ्यांनी धाडले माघारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

येवला : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथक आज (शुक्रवार) देवठाण गावात आले होते. मात्र, वसुली प्रक्रिया थांबली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिल्यावर वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले. 

येवला : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथक आज (शुक्रवार) देवठाण गावात आले होते. मात्र, वसुली प्रक्रिया थांबली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिल्यावर वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले. 

महाराष्ट्र शासनाने कर्ज वसुलीस स्थगिती दिली असताना तुम्ही लिलाव कसे करता? शासनाच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. शेतीमालाला भाव मिळत नसून निर्यात बंदी, सीमा बंदीमुळे टोमॅटो, कांदा, फळभाज्यांना सध्या भाव मिळत नाहीत, तर अतिवृष्टी, गारपीट यामुळे वेळोवेळी पिकाचे नुकसान झाले. त्यात यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, अशी भावना येथे जमलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज, सिंचनासाठी कर्ज घेतले असून शेतीमालाला रास्त भाव न मिळाल्याने कर्ज थकले आहे. त्यामुळे वसुली अधिकारी येण्याआधी सोसायटी कार्यालय सचिवाला उघडू न देता ठिय्या मांडला. वसुली पथक येताच शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लिलाव मोहिमेचा निषेध केला. तसेच शेतकरी कर्ज का भरू शकत नाही, अशा आशयाचे निवेदन दिले.

नाशिक जिल्हा बँकेने कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 31 मे रोजी जळगाव नेऊर, 4 जून रोजी कोटमगावात शेतकरी संघटनेने आंदोलन करून लिलाव रोखल्यानंतरही नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली पथक आज (शुक्रवार) देवठाण गावात आले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, महिला आघाडीच्या निर्मला जगताप, संध्या पगारे, अरूण जाधव, प्रहार शेतकरी संघटनेचे हरिभाऊ महाजन, सरपंच मीरा जानकर, नामदेव कदम, भरत बोंबलेंसह शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovery officers of bank sent back by farmers in Devthan, Nashik