आल्हाद जोशी : एरंडोल- राष्ट्रीय महामार्गावरील कासोदा फाट्याजवळील (अमळनेर नाका) रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा(न्हाई)ने मोठमोठे सिमेंटचे गार्ड टाकून बंद केला आहे. त्यामुळे शहरासह नवीन वसाहतींतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. .वारंवार होणारे अपघात लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांनी यावर पर्यायी उपाययोजना न करताच रस्ता बंद करून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याची संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांमधून व्यक्त केली जात आहे. म्हणून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे..राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, समांतर रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूस असलेल्या गटारींची कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. कासोदा फाट्यावर यापूर्वी अनेक अपघात होऊन सात ते आठ निरपराध नागरिकांचे बळी गेल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करून याठिकाणी अंडरपास उभारण्याची मागणी केली होती. मात्र, ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना न करता रस्ता बंद करून नागरिकांसमोर मोठी समस्या उभी केली आहे. जुना धरणगाव रस्त्यावरील नवीन.वसाहतींमधील रहिवासी व शहरातील नागरिक, शेतकरी यांच्यादृष्टीने कासोदा फाट्याजवळील रस्ता अत्यंत सोयीचा आहे. जुन्या धरणगाव रस्त्यावरच टपाल कार्यालयासह दवाखाने, शाळा आहेत. म्हणून हा रस्ता बंद केल्याने नागरिकांना सुमारे दोन ते तीन किलोमिटर फिरून आपल्या दैनंदिन कामासाठी जावे लागत आहे. कासोदा फाट्यापासून टपाल कार्यालय केवळ पन्नास ते शंभर मीटर अंतरावर आहे..शेकडो महिला, ज्येष्ठ नागरिक व्यवहार करण्यासाठी टपाल कार्यालयात जातात. मात्र, आता रस्ता बंद केल्याने दोन किलोमीटर फिरून ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांनाही तीन ते चार किलोमीटर फिरून शेतात जावे लागत आहे. या परिसरातील व्यावसायिकांच्या व्यवसायांवरही रस्ता बंदचा प्रतिकूल परिणाम होऊन आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे..अंडरपास केल्यास अपघात टळणार!कासोदा फाट्यासह पिंप्री फाटा येथे अंडरपास करण्याची मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. कासोदा फाटा व पिंप्री फाटा या ठिकाणी अंडरपास केल्यास नागरिकांची होणारी गैरसोय दूर होऊन अपघातापासूनही मुक्तता मिळणार आहे. श्रीदत्त मंदिरापासून कृष्णा हॉटेलपर्यंत उड्डाणपूल होण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. .फागणे ते तरसोद मार्गावर अनेक ठिकाणी उड्डाण पुलांचे बांधकाम करण्यात आले असून, एरंडोलवरच अन्याय का, असा प्रश उपस्थित केला जात आहे. याबाबत खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून यावर तातडीने उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.