Nandurbar News : ठेकेदाराच्या जप्त डिपॉझिटमधून रस्त्याची दुरुस्ती; बांधकाम विभागाची कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damaged Road

Nandurbar News : ठेकेदाराच्या जप्त डिपॉझिटमधून रस्त्याची दुरुस्ती; बांधकाम विभागाची कामगिरी

आमलाड (जि. नंदुरबार) : संबंधित ठेकेदाराचे डिपॉझिट जप्त करीत बांधकाम विभागाने आमलाड ते बोरद या बारा किलोमीटर रस्त्याची डागडुजी नुकतीच केली. त्यामुळे ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली असून, वाहनधारकांमधून विभागाच्या कृतिशीलतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. (Road repair from contractors forfeited deposit Performance of construction department Nandurbar News)

संबंधित ठेकेदाराने २०१८ मध्ये आमलाड ते बोरद या राज्य महामार्ग क्रमांक एक रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण केले होते. त्यासाठी केंद्रीय रस्ते निधी व राज्य रस्ते निधीतून सुमारे १६ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. रस्त्याचे काम झाले, मात्र दोन-अडीच वर्षांनंतर रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले.

त्यामुळे वाहनधारक, परिसरातील जनता व शेतकरी यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची लेखी-तोंडी मागणी वारंवार केली. त्यानुसार बांधकाम विभागाच्या स्थानिक व वरिष्ठ कार्यालयाकडून दखल घेत संबंधित ठेकेदारास दुरुस्ती करण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली.

मात्र संबंधित ठेकेदाराने त्या पत्रांना केराची टोपली दाखविली व रस्तादुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक संबंधित ठेकेदाराने रस्त्याची पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीची करण्याची जबाबदारी स्वीकारलेली असते.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: Marriages During Corona : अल्पावधीतच वाढली नवविवाहितांची घटस्फोटांची मागणी!

रस्त्याच्या कामाची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी असताना त्यास स्पष्ट नकार दिल्याने शेवटी ठेकेदाराचे ५३ लाख रुपयांचे डिपॉझिट सार्वजनिक बांधकाम विभागाने जप्त केले व रस्त्याची दुरुस्ती हॉटमिक्सने नुकतीच पूर्ण केली. तथापि, रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे ठिकठिकाणी दिसत असल्याने ही दुरुस्तीही निकृष्ट केल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.

दुर्लक्षामुळे कारवाई

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक कार्यालयाने तीनदा व वरिष्ठ कार्यालयाने दोनदा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी संबंधित ठेकेदारास पत्र दिले. मात्र त्याची कुठल्याही प्रकारची दखल न घेता दुर्लक्ष केल्यानेच ही कारवाई केली गेल्याचे बोलले जात आहे.

"आमलाड ते बोरद रस्ता दुरुस्तीकरिता संबंधित ठेकेदारास नियमाप्रमाणे अनेक वेळा लेखी नोटीस देण्यात आली होती. त्याने दुरुस्तीचे काम करण्यास दुर्लक्ष केल्याने त्याचे डिपॉझिट जप्त करून या जप्त केलेल्या रकमेतून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे."

-नितीन वसावे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तळोदा

हेही वाचा: 2000 Rupee Note : 2 हजारांच्या नोटा नेमक्या गेल्या तरी कुठं?