SAKAL Impact : विविध अधिकारी काकडमाळच्या दारी!; पात्र लाभार्थ्यांना जागीच शिधापत्रिकांचे वाटप

District Magistrate Pramod Bhamre, Tehsildar Aba Mahajan while distributing ration cards to the villagers on Tuesday.
District Magistrate Pramod Bhamre, Tehsildar Aba Mahajan while distributing ration cards to the villagers on Tuesday.esaka

शिरपूर (जि. नाशिक) : महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील काकडमाळच्या (ता. शिरपूर, जि. धुळे) दैन्यावस्थेकडे `सकाळ`ने लक्ष वेधल्यानंतर महसूल, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, वीज कंपनी अशा सर्वच विभागांचे वरिष्ठ अधिकारी मंगळवारी (ता. ६) काकडमाळ येथे धडकले. अधिकाऱ्यांची मांदियाळी पाहून आनंदलेल्या ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. प्राथमिक स्वरूपातील अडचणींचा जागीच निपटारा करून दिल्यानंतर उर्वरित समस्याही तातडीने सोडवल्या जातील, असे आश्वासन प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी दिले. (SAKAL Impact Various officials at Kakadmal Distribution of ration cards to eligible beneficiaries on spot Nashik news)

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

`सकाळ`ने सहा नोव्हेंबरला `काकडमाळ ग्रामस्थ भोगताहेत सजा- ए- कालापानी` या शीर्षकाखाली तेथील ग्रामस्थांची कैफियत मांडणारा ग्राऊंड रिपोर्ट प्रसिद्ध झाला. त्याची तातडीने दखल घेत संवेदनशील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांना काकडमाळ येथे जाण्याचे निर्देश दिले. नंतर प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार आबा महाजन, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता, वीज कंपनीचे उपअभियंता, वैद्यकीय अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दुपारी काकडमाळ येथे दाखल झाले.

अडचणींची सोडवणूक

काकडमाळच्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर अडचणी मांडल्या. नंतर पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्यात आल्या. सामाजिक अर्थसाहाय्य योजनेपासून वंचित गरजूंचे जागीच अर्ज भरून घेण्यात आले. तेथील शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांशी अधिकाऱ्यांनी चर्चा केली. प्रांताधिकाऱ्यांच्या भेटीत एका कुटुंबात मध्यम कुपोषित बालक आढळले. त्यावर उपचार करण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. लसीकरणाची माहितीही श्री. भामरे यांनी घेतली. वीज कंपनीतर्फे गावासाठी सिंगल फेज यंत्रणा देऊन अखंड वीजपुरवठा करण्याचे सांगण्यात आले. गावठाणासाठी स्वतंत्र फीडर देऊन कूपनलिकेतून पाणीपुरवठ्यासाठी सुविधा देण्यासही अग्रक्रम दिला जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठांकडे तातडीने प्रस्ताव देण्यात येणार आहे.

रस्त्यासाठी पाठपुरावा

रस्त्याअभावी तुटणारा संपर्क ही काकडमाळची प्रमुख अडचण आहे. शेमल्या येथून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम २०१३ मध्ये सुरू झाले. पण तेथून काकडमाळपर्यंत तब्बल १९ हेक्टरचे क्षेत्र वन खात्याच्या अखत्यारीत आहे. तेथे पक्के बांधकाम करण्यासाठी वन विभागाची परवानगी मिळत नाही. परवानगी मिळावी यासाठी प्रशासनाने नागपूर येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयाशी पत्रव्यवहार चालवला आहे. मात्र, अद्याप मार्ग निघू शकलेला नाही, असे या विभागातर्फे सांगण्यात आले. आता खुद्द जिल्हाधिकारी शर्मा यांनीच या प्रश्नाची दखल घेतली असून हा प्रश्न युद्धपातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हा घ्या मोबाईल नंबर !

गावातील समस्येबाबत कोणतीही अडचण असल्यास माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधू शकता असे सांगून प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी स्वत:चा मोबाइल नंबर ग्रामस्थांना दिला. शिरपूरला येऊन माझ्या कार्यालयात भेटा, मी फेब्रुवारीमध्ये पुन्हा गावात येणार असून झालेल्या कामांचा आढावा घेणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. स्वत:चा मोबाइल नंबर देणारा प्रशासनातील वरिष्ठ पदावरचा अधिकारी पाहून ग्रामस्थांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

"काकडमाळ येथील सामान्य स्तरावरील समस्यांचा आठवडाभरात निपटारा केला जाईल. त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. दळणवळणाच्या सुविधेअभावी तुटणारा संपर्क हा तेथील प्रमुख प्रश्न असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल देणार आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तेथील प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत." - प्रमोद भामरे, प्रांताधिकारी, शिरपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com