नांदूरमधमेश्‍वरमधील प्रगणनेत पक्षी आढळलेत पाच हजारांहून अधिक

Live Photo
Live Photo

नाशिक ः दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते अन्‌ स्थलांतरीत "पाहुण्यां'चा किलबिलाट नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात ऐकायला मिळतो. यंदा दिवाळीनंतरही पाऊस सुरु राहिल्याने स्थलांतरीत पक्षांचे आगमन होण्यास उशीर झाला. मोठ्या पर्जन्यमानामुळे अभयारण्यातील "नेचर ट्रेल'चा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. वनविभागाच्या पक्षी प्रगणनेत पाच हजारांहून अधिक पक्षी आढळलेत. 
पक्षी अभयारण्यातील सर्व मनोऱ्यावरुन सकाळी साडेसात ते दहापर्यंत पक्षांची गणना करण्यात आली. त्यामध्ये विविध जातीचे 4 हजार 698 पानपक्षी, तर विविध झाडांवर 989 पक्षांची नोंद झाली. पानपक्ष्यांमध्ये हळदीकुंकू, वारकरी, जांभळी पानकोंबडी, पिनटेल, पोचार्ड, राखी बगळा, जांभळा बगळा, तुतवार, थापट्या, गढवाल, मार्श हेरीअर, गरुड, पानकावळे, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा आदी पक्षी इथे पाह्यला मिळतात. पावसामुळे वन विभागाने तयार केलेला "नेचर ट्रेल'चा रस्ता वाहून जाण्याबरोबर गाळपेऱ्यामध्ये गुडघ्याएवढे पाणी साठल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. 
धरणातील पाणीसाठा वाढल्याने पाणी निरीक्षण मनोऱ्यापर्यंत आल्याने किंगफिशर पक्ष्यांची संख्या वाढली असून माश्‍यावर ताव मरणारे किंगफिशर पर्यटकांना अनुभवायला मिळतात. उघड्या चोचीचे करकोचे हे शेतामध्ये गोगलगाय खाताना दिसतात. वेडाराघू आणि हुदहुद हे दोन पक्षी वन विभागाच्या बागेत किडे खाण्यात मग्न असतात. पर्यटकांना हे पक्षी जवळून पाहता येताहेत. पक्षी गणनेमध्ये वनपाल अशोक काळे, चंद्रमणी तांबे, अश्विनी पाटील, गिरीश ताजने, योगेश मोरे, ज्ञानेश्वर फापाळे, गंगाधर आघाव, प्रमोद पाटील, संजीव गायकवाड, एकनाथ साळवे, प्रकाश गांगुर्डे, अमोल दराडे, प्रमोद दराडे, अमोल डोंगरे, शंकर लोखंडे, पंकज चव्हाण, रोशन पोटे, रमेश भराडे आदी सहभागी झाले होते. 

प्रगणनेत आढळलेल्या पक्षांची संख्या 
वारकरी ः 1 हजार 200 
जांभळी पानकोंबडी ः 800 
किंगफिशर ः 20 
हळदी कुंकू ः 55 
राखी बगळा ः 20 
उघड्या चोचीचा करकोचा ः 18 

अभयारण्यातील अडचणी 
0
बागेमध्ये मोठ्याप्रमाणात साठले पाणी 
0 पिण्याच्या पाण्याची अडचण 
0 स्वच्छतागृहामध्ये नाही पाणी 
0 पाण्यामध्ये प्रचंड वेली वाढल्याने पक्ष्यांना बसण्यास नाही जागा 
0 नवीन बनविलेले लपणगृह पाण्यात 

गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पक्षी अभयारण्यात अनेक ठिकाणी पाणी साठले होते. ते काढण्यात आले आहे. पावसामुळे पक्षी विखुरलेले आहेत. पुढील आठवड्यात पक्षांची संख्या वाढेल. 
- अशोक काळे (राऊंड ऑफिसर, वन विभाग) 
 

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com