दरीत अडकलेल्या  गाईचे प्राण शिक्षकांच्या ग्रुपने वाचवले 

Live Photo
Live Photo

नाशिक ः मेटघर किल्ल्याच्या भागातील खोल दरीत कोसळून अडकून बसलेल्या गाईचे प्राण आज शिक्षकांच्या भटकंती ग्रुपने वाचवले. ही गाय डोंगरावरुन घसरुन जखमी अवस्थेत पडून होती. 
श्रावणात ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करुन निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक प्रदीप शिंदे यांनी या ग्रुपची स्थापना केली आहे. सहकारी शिक्षकांना सुटीच्या दिवशी सह्याद्रीच्या डोंगररांगा भागात नेऊन प्रेक्षणीय, ऐतिहासिक, निसर्गरम्य स्थळांना भेटी देण्याचा उपक्रम राबवला जातो. श्री. शिंदे यांच्यासह प्रकाश चव्हाण, प्रशांत बागूल, प्रवीण कुमावत, दीपक शेवाळे आदींनी गंगाद्वार येथील गोदामाईच्या संगमाच्या तीर्थाला भेट दिली. खाली उतरत असताना पावसाची रिपरिप सुरू होती. रसाच्या दुकानात हे सर्वजण पोचले असताना एका आजींनी मेटघर किल्ल्याच्या दरीत गाय पडली असल्याची माहिती दिली. हे ऐकल्यावर सर्वांनी दरीचा शोध घेण्याचे ठरवले. 
दरीमध्ये गाय पडलेली होती सर्वांना दिसली. गाईला उठता येत नव्हते. तिचे पुढील दोन पाय खडकांच्या अरुंद फटीत अडकलेले होते. ग्रुपमधील सर्वांनी तासभर प्रयत्न करुनही गाय जागेवरुन हलली नाही. मग सर्वांनी ताकद लावून गाईचे पाय मोकळे केले. तिला दोन्ही दगडांच्या बाहेर ओढले. ही गाय कशी तरी उभी राहिली. चारा खाऊ लागली. त्यावेळी सायंकाळचे पाच वाजलेले होते. 

ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेत आजींमुळे गाईचे प्राण वाचवण्याचे समाधान आम्हा सर्वांना मिळाले. जखमी होऊन खडकांमध्ये अडकलेली गाय बाहेर पडू शकली नसती, तर काय झाले असते याची कल्पना देखील करवत नाही. 
-प्रदीप शिंदे (शिक्षक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com