महिलांसह ग्रामस्थांची पायपीट थांबणार 

दीपक कच्छवा 
रविवार, 19 मे 2019

पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच पंचायत समिती प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन अभोणे गाव व तांडा येथे पुन्हा टँकर सुरू केले आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - अभोणे तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत होते. अभोणे गावासह तांड्यावर आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर येणे बंद झाले होते. येथील पाणीटंचाई संदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त झळकताच पंचायत समिती प्रशासनाने या वृत्ताची दखल घेऊन अभोणे गाव व तांडा येथे पुन्हा टँकर सुरू केले आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांची पायपीट पुन्हा एकदा थांबली आहे. 

अभोणे गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. ग्रामस्थांना आजूबाजूच्या शेतातून पाणी आणावे लागत होते. अभोणे गाव व तांडा कळमडू ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतात. तांड्याजवळच्या ग्रामपंचायतीच्या विहिरीचे पाणी आटल्याने या ठिकाणी टँकरने पुरवठा सुरू झाला होता. मात्र, आठ दिवसांपासून प्रशासनाने टँकर बंद केले होते. परिणामी, ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली होती. या संदर्भात दै. ‘सकाळ’मध्ये १६ मे च्या अंकात ‘टंचाईच्या झळा’ या पानावर ‘विहिरींनी गाठला तळ, टँकरही फिरकेना’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून ग्रामस्थांची व्यथा मांडण्यात आली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने पुन्हा टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. 

दुसऱ्या दिवशी टँकर सुरू 
अभोणे व तांडा येथे आठ दिवसांपासून बंद केलेले टँकर १७ मे पासून सुरू केले. सुमारे २४ हजार लीटर क्षमता पाणी असलेले टँकर ग्रामपंचायतीच्या विहिरीत टाकण्यात आले. खेडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरद्वारे अभोणेत पाणी आणण्यात आले. आता प्रशासनाने या गावाला टँकरच्या फेऱ्यांमध्ये खंड पडू न देता, ते सुरूच ठेवावे, अशी मागणी होत आहे. बऱ्याचदा रस्ता खराब असल्याने गावात टँकर नेता येत नसल्याचे टँकरचालकाकडून सांगितले जाते. मात्र, टँकर गावात येण्याइतका रस्ता चांगला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

लोकसंख्येनुसार टँकरने पुरवठा 
अभोणे गाव व तांड्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ८७५ आहे. या जनगणनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या सात वर्षात दोन्ही ठिकाणी लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे जुनी लोकसंख्या गृहीत न धरता नवीन वाढीव लोकसंख्या गृहीत धरून टँकरच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सद्यःस्थितीत दोन्ही गाव मिळून सुमारे पंधराशेच्या आसपास लोकसंख्या आहे. एका व्यक्तीला ३० लीटर या गणितानुसार पाणी मिळणे गरजेचे आहे. 

नवीन प्रस्ताव मागवला 
येथील ग्रामपंचायतीने तांडा व गावासाठी टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. पंचायत समितीने तो प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावात अभोणे गावासाठी एक तांड्यावर एक अशी प्रत्येकी १२ हजार लिटर क्षमतेचे पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. या मागणीनुसार, प्रशासनाने टँकर सुरू केले आहे. दरम्यान, आज रहिपुरी येथे अधिग्रहण केलेल्या चाळीसगाव पालिकेच्या विहिरीवर वीजपुरवठा नसल्याने टँकर भरता आले नाही. त्यामुळे आज टँकर पाठवता आले नाही, अशी माहिती पंचायत समितीच्या सूत्रांकडून देण्यात 
आली. 

गाव व तांड्यावर निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेऊन आम्ही प्रशासनाकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील अर्ज पंचायत समितीकडे पाठवला होता. मात्र, आमच्या अर्जाची दखलच घेतली गेली नव्हती. ‘सकाळ’मध्ये पाणीटंचाई संदर्भातील वृत्त झळकल्यानंतर प्रशासनाने टँकर पुन्हा सुरू केले. त्यामुळे ‘सकाळ’चे आम्ही आभारी आहोत. 
- कविता पाटील, सरपंच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news impact administration has started water tankers