अंजनेरी गावातील पूरातन 16 मंदिरांची अवस्था बिकट 

Live Photo
Live Photo

नाशिक ः दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ म्हणून नाशिककडे पाह्यले जाते. भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाश्‍याने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला होता. गौतम ऋषींनी गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला. त्याकाळात ते इथले रहिवासी होते. सातवाहन काळात नाशिकला महत्व होते. अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्‍वर) हे गवळी राजांच्या राजधानीचे शहर होते. 
अंजनेरी पर्वताच्या व गावाच्या पायथ्याला चालुक्‍य ते यादवकालीन जुनी 16 मंदिरे आहेत. त्यापैकी 12 जैन व 4 हिंदूची मंदिरे आहेत. काळ्या पाषाणातील ही मंदिरे आहेत. एका जैन मंदिरात इ. स. 1142 ( शके 1063) मधील शिलालेख आहे. त्याच्यावर सेऊनचंद्र तिसरा यादव राजाचा एक मंत्री याठिकाणी दानधर्म देत असल्याचा उल्लेख आहे. या मंदिर परिसरात प्राचीन दगडी शिल्पांचे दर्शन घडते. त्याकाळात अंजनेरी गावात असंख्य मंदिरे उभारली गेली. या मंदिरांची अवस्था बिकट आहे. पूरातन विभागाने तारेचे कुंपण केले आहे. मूर्ती व अवशेष जागेवर आहेत. आठवे जैन तीर्थंकर चंद्रप्रभू यांचीही मूर्ती आहे. गावाजवळील नाणे संशोधन केंद्र, ब्रह्मा व्हॅली, सपकाळ नॉलेज अशा शैक्षणिक संस्थांमुळे अंजनेरीचे रूप बदलून गेले आहे. अंजनेरी पर्वतावर अंजनीमाता मंदिर आहे. अंजनी मातेच्या नावावरून गावाला अंजनेरी नाव पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 
गावाची लोकसंख्या तीन हजार इतकी असून गावात हनुमान, दत्त, म्हसोबा, गणपती, कार्तिक स्वामी आदी मंदिरे आहेत. चैत्र पौर्णिमेला गावात यात्रोत्सव होतो. राम नवमीला हरिनाम सप्ताह होतो. ही परंपरा शंभर वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे. गावात पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आहे. मात्र गावात वाचनालय, व्यायामशाळा नाही. गावाच्या पाझर तलावातून गावाला पिण्याचे पाणी मिळते. राष्ट्रीय पेयजल योजनेतून एक कोटींचा निधी पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर झाला आहे. गावात अनेक वर्षांपासून भजनी मंडळ कार्यरत आहे. विष्णू चव्हाण, त्र्यंबक चव्हाण, अंबादास चव्हाण, दामू चव्हाण आदींसह अनेकजण भजन म्हणतात. गावात अनेक मल्ल आहेत. संदीप चव्हाण, निवृत्ती चव्हाण, चेतन चव्हाण हे नवी पिढी घडवत आहेत. गावात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. अंजनेरी पर्वतामुळे हा परिसर नेहमी पर्यटकांनी गजबजलेला असतो. गावत शंभरहून अधिक लेणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. अंजेनेरी गावाचा विकास संदीप फाऊंडेशनच्या सी. एस. आर. निधीतून करण्यात येत आहे. हे गाव आदर्श-स्मार्ट गाव बनवण्यासाठी संदीप फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप झा यांच्या माध्यमातून कामे सुरु आहेत. त्यामध्ये सौर ऊर्जा, रोजगार, शिक्षण, आरोग्य, ग्रामस्वच्छता यासोबत जलसंधारणचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 
अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले. त्यातील निम्म्या वनस्पती पश्‍चिम घाटात आणि देशभरात आढळतात. सिरोपेजिया अंजनेरिका ही दुर्मीळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही. ती अंजनेरी डोंगरावर आहे. तसेच गावात गिधाड संवर्धनसाठी वन विभाग सक्रीय आहे. 

गावात विकासाची अनेक कामे सुरु झालीत. पर्यटन क्षेत्र विकाससाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गाव सौर ऊर्जेवर सक्षम करणार असून गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी मी स्वतः ची चार गुंठे जागा दिली आहे. गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेवले असून यासाठी सर्वांची साथ मिळत आहे. 
- पंडीत चव्हाण (उपसरपंच) 

अंजेनेरी आणि ब्रह्मगिरी परिसरात गिधाड संवर्धनासाठी वन विभागाने "वल्चर रेस्टॉरंट सुरु केले आहे. गावातील तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गिधाड अधिसूचीत पक्षी असून त्याच्या संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याला यश मिळत असून भविष्यात गिधाडाची संख्या वाढलेली दिसेल.
- कैलास आहेर (वन परीक्षेत्र अधिकारी) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com